पालकमंत्री खोतकर यांच्यासमोर नांदेडमध्ये अनेक आव्हाने

Arjun Khotkar Sena
Arjun Khotkar Sena

नांदेड : अखेर नांदेड जिल्ह्याला अर्जुन खोतकर यांच्या रूपाने नव्या वर्षात नवीन पालकमंत्री मिळाला असून पूर्वीचे पालकमंत्री दिवाकर रावते यांच्याकडे उस्मानाबादची जबाबदारी देण्यात आली आहे. गेल्या अडीच वर्षात झेंडावंदनाला देखील आयत्या वेळेवर उपस्थित राहणारे पालकमंत्री रावते यांच्या विरोधात नाराजीचा मोठा सूर उमटला होता. त्यामुळे अखेर बदल झाला असून यापुढे नांदेड जिल्ह्यातील विकासाची कामे मार्गी लागतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. 

गेली तब्बल अडीच वर्षे नांदेडचे पालकमंत्री राहून देखील दिवाकर रावते यांनी अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतकीच उपस्थिती नांदेडला दाखविल्यामुळे सत्ताधारी शिवसेना भाजपसह विरोधी पक्ष असलेल्या कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजीचा सूर आळवला होता. परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्याकडे नांदेडसह परभणीचेही पालकमंत्रीपद होते. त्यात त्यांचे नांदेडपेक्षा परभणीवरच जास्त प्रेम असल्यामुळे त्यांचे साहजिकच नांदेडकडे दुर्लक्ष होत होते. सुरवातीपासूनच त्यांची भूमिका सकारात्मक नसल्याची जाणीव होत होती. झेंडावंदनाव्यतिरिक्त किंवा एखाद्या नियोजनाच्या बैठकीला त्यांची उपस्थिती असायची. त्यामुळे शिवसैनिकांसह पदाधिकाऱ्यांमध्येही त्यांच्याबद्दल फारसा उत्साह नव्हता. त्यांचे नांदेडपेक्षा परभणीवर जास्त प्रेम असल्याच्या तक्रारी सेनेकडूनच जास्त झाल्या होत्या. 

मध्यंतरी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी देखील नांदेडला पालकमंत्री पूर्णवेळ द्यावा, अशी मागणी केली होती. त्याचबरोबर श्री. चव्हाण यांनी रावते गेल्या तीन महिन्यापासून नांदेडला आले नसल्यामुळे मागील आठवड्यात पालकमंत्र्यांवर सडकून टीका केली होती. 

परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्याकडील नांदेड आणि परभणीचे पालकमंत्रीपद काढून त्यांना आता उस्मानाबादची जबाबदारी देण्यात आली आहे. नांदेडला नव्या वर्षात नवे पालकमंत्रीपद मिळाल्यामुळे शिवसैनिकांसह विरोधी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी देखील नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला आनंद व्यक्त करत शुभेच्छा दिल्या आहेत. खरे तर श्री. रावते म्हणजे शिवसेनेतील ज्येष्ठ त्याचबरोबर अनुभवी व्यक्तिमत्त्व आहेत मात्र त्यांचा गेल्या अडीच वर्षात नांदेड जिल्ह्याला आणि शिवसेनेलाही फारसा फायदा झाला नाही. त्यातच जिल्ह्यात नऊ पैकी चार सेनेचे आमदार असताना देखील एकही नगराध्यक्षपदी निवडून आला नाही की कुठे स्पष्ट बहुमत नगरपालिकेत मिळाले नाही. त्यामुळेच नवीन वर्षात अपेक्षित बदल झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. नवीन वर्षात शिवसेनेला चांगले दिवस आणण्यासाठी नव्या पालकमंत्र्यांना आव्हांनांचे शिवधनुष्य उचलावे लागणार आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com