किल्लारी, उमरगा, लोहारा परिसर भूकंपाने हादरला

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 नोव्हेंबर 2016

लातूर, उमरगा - भूकंपग्रस्त किल्लारी (ता. औसा) व परिसर, उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा, लोहारा तालुक्‍यांतील अनेक गावांना बुधवारी (ता. दोन) दुपारी पावणेतीनच्या सुमारास भूकंपाचा सौम्य धक्का बसला. लातूर येथील भूकंप मापक केंद्रावर त्याची दोन रिश्‍टर स्केल नोंद झाली. या धक्‍क्‍यात कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही. ग्रामस्थांत मोठी घबराट निर्माण झाली.

भूकंपग्रस्त भागात दिवाळी उत्साहात साजरी होते न्‌ होते तोच आज हा परिसर भूकंपाच्या धक्‍क्‍याने हादरला. सर्व व्यवहार सुरळीत सुरू असतानाच किल्लारीसह गुबाळ, नांदुर्गा, तळणी, कारला, सिरसल, नदीहत्तरगा आदी भागांत दुपारी 2.41 ला भूकंपाचा सौम्य धक्का बसला. लातूरच्या भूकंप मापक केंद्रापासून 41 किलोमीटरवरील किल्लारी परिसरात भूकंपाचा केंद्रबिंदू आहे. या भागाला 17 फेब्रुवारी 2015 ला 2.4 रिश्‍टर स्केलचा भूकंपाचा धक्का बसला होता. त्यानंतर म्हणजे दीड वर्षानंतर आज पुन्हा भूकंपाचा धक्का बसला.

लोहारा तालुक्‍यातील सास्तूर, होळी, एकोंडी (लो.), रेबे चिंचोली, राजेगाव, मुर्शदपूर, कोंडजीगड, उमरगा तालुक्‍यातील नारंगवाडी, पेठसांगवी, बोरी, मातोळा, सावळसूर, बाबळसुर, कवठा, समुद्राळ, कोंडजीगडसह परिसरातील भागात भूकंपाचा धक्‍का जाणवला. जवळपास आठ ते दहा सेकंदांचा तो होता. एकाचवेळी जमिनीतून मोठा आवाज आणि हादरा बसल्याने भयभीत होऊन ग्रामस्थ घराबाहेर पडले. लहान मुले, वृद्धांची तारांबळ उडाली. लोहारा येथील प्रभारी तहसीलदार रोहन काळे यांनी सास्तूर भागाला भेट देऊन ग्रामस्थांची विचारपूस केली, त्यांना धीर दिला. या भूकंपात कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली नसल्याची माहिती त्यांनी दिली.

किल्लारी केंद्रात कर्मचारीच नाहीत
1993 च्या भूकंपानंतर किल्लारी येथे लाखो रुपये खर्च करून भूकंप मापन केंद्र उभारण्यात आले आहे. भूकंपाची माहिती देण्यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांची भरती करण्यात आली होती. सध्या या केंद्रात एकही कर्मचारी अथवा अधिकारी नाही. भूकंपाची तीव्रता जाणून घेण्यासाठी काही ग्रामस्थांनी दुपारी केंद्राला भेट दिली. त्या वेळी तेथे कर्मचारी नसल्याचे आढळले.

Web Title: Killarney, umaraga premises earthquake shock

टॅग्स