गॅस नळी बदलताना आग; आठ जण भाजले

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 सप्टेंबर 2017

किल्ले धारूर - शहरातील उदयनगर भागातील एका खानावळीत स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरची नळी बदलताना सोमवारी (ता. चार) दुपारी अचानक आग लागली. यात आठ जण भाजले. त्यापैकी खानावळीच्या मालकिणीची प्रकृती गंभीर आहे. उदयनगर भागात विमल बन्सी काळे (वय 40) या एक खानावळ चालवितात. सोमवारी दुपारी त्यांच्या खानावळीत त्या गॅस सिलिंडरची नळी बदलत होत्या. या वेळी आग लागून विमल यांच्यासह सूर्यकांत हरिश्‍चंद्र सोनवळकर, संजय बाळकृष्ण सोनवळकर, महारुद्र पोटभरे, रामराव माळेकर, किसन चव्हाण , रमेश मोहरे व बाळू आडे हे भाजले. मानवी हक्कचे कार्यकर्ते विजय लोखंडे यांना ही माहिती समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत तत्काळ आग आटोक्‍यात आणण्यास प्रयत्न केले. शिवाय इतर नागरिकांच्या मदतीने जखमींना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
Web Title: kille dharur beed news fire by gas blast