क्‍लासेसचालकाचा लातूरमध्ये खून

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 जून 2018

लातूर - येथील ‘स्टेप बाय स्टेप’ व ‘दिशा’ क्‍लासेसचे संचालक अविनाश बाबूराव चव्हाण (वय ३४) यांचा सोमवारी (ता. २५) मध्यरात्री अज्ञात व्यक्तींनी गोळी झाडून खून केला. येथील महसूल कॉलनीतील शिवाजी विद्यालयाच्या परिसरात घडलेल्या या घटनेने शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली. चव्हाण यांच्या नातेवाइकांनी दोन राजकीय व एका क्‍लासचालकावर संशय व्यक्त केला असून यापैकी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. वेगवेगळ्या अंगाने तपासासाठी पोलिसांची पाच पथके तैनात करण्यात आली आहेत.

लातूर - येथील ‘स्टेप बाय स्टेप’ व ‘दिशा’ क्‍लासेसचे संचालक अविनाश बाबूराव चव्हाण (वय ३४) यांचा सोमवारी (ता. २५) मध्यरात्री अज्ञात व्यक्तींनी गोळी झाडून खून केला. येथील महसूल कॉलनीतील शिवाजी विद्यालयाच्या परिसरात घडलेल्या या घटनेने शैक्षणिक क्षेत्रात खळबळ उडाली. चव्हाण यांच्या नातेवाइकांनी दोन राजकीय व एका क्‍लासचालकावर संशय व्यक्त केला असून यापैकी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. वेगवेगळ्या अंगाने तपासासाठी पोलिसांची पाच पथके तैनात करण्यात आली आहेत.

उद्योग भवन परिसरात त्यांचे कार्यालय आहे. स्वतःच कार (एमएच ४३, एझेड ४७) चालवीत अविनाश चव्हाण काल रात्री घरी निघाले होते. मध्यरात्री साडेबारा ते पाऊणच्या सुमारास कार ‘आशियाना’ बंगला रस्त्यावर शिवाजी विद्यालयाच्या परिसरात आली. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या मारेकऱ्यांनी त्यांच्यावर पिस्तुलातून गोळी झाडली.  कारची काच फोडून ही गोळी छातीत लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. 

पोलिस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड, अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. काकासाहेब डोळे, उपअधीक्षक हिंमत जाधव यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. जिल्ह्यात नाकाबंदी केली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आज दुपारी शवविच्छेदन झाले. संशयितांना अटक करावी, अशी मागणी करीत चव्हाण कुटुंबीयांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. त्यामुळे सायंकाळपर्यंत रुग्णालयात मोठी गर्दी होती. अविनाश चव्हाण यांचे मावसभाऊ अशोक पवार यांच्या फिर्यादीवरून तिघा संशयितांविरोधात शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. अविनाश चव्हाण यांनी केमिस्ट्री विषयाच्या एका प्राध्यापकाशी करार केला होता. परंतु ते अन्य क्‍लासवर शिकवण्यासाठी गेल्याने त्यांच्यात व्यावसायिक प्रतिस्पर्धक निर्माण झाले होते. राजकीय कारणावरून त्यांचे इतर काहींशी वैमनस्य निर्माण झाले होते. या दोन्ही बाबींवरून अविनाश चव्हाण यांचा खून केला असावा, असे पवार यांनी फिर्यादीत म्हटले आहे. दोन राजकीय व एका क्‍लासेसचालकावर संशय व्यक्त करण्यात आला आहे. यापैकी दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

अल्पावधीत बसविला होता जम
अविनाश चव्हाण यांनी येथील उद्योग भवन परिसरात गेल्या चार वर्षांपासून ‘स्टेप बाय स्टेप’ व ‘दिशा’ क्‍लासेसच्या नावाने अकरावी, बारावी फिजिक्‍स, केमिस्ट्री, बायोलॉजीचे वर्ग सुरू केले होते. गेल्या वर्षी त्यांनी ‘एसी’ व ‘डीसी’ नावानेही क्‍लासेस सुरू केले होते. नांदेड येथेही शाखेचे सोमवारी (ता. २५) उद्‌घाटन होणार  होते. दिल्ली पब्लिक स्कूलसोबत लातूरमध्ये व्यावसायिक पार्टनर म्हणूनही शाळा काढण्यासाठी त्यांनी औसा रस्त्यावर जागा घेतल्याची चर्चा आहे. कमी कालावधीत त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात आपला जम बसविला होता. काही महिन्यांपूर्वीच त्यांनी ‘ॲडॉल्फ’ नावाचे जीम सुरू केले होते. त्याच्या उद्‌घाटनासाठी अभिनेत्री सनी लियॉन आली होती.

घटनास्थळी एक मिस फायर पिस्तूलचा राउंड, एक फायर झालेली पुंगळी जप्त करण्यात आली आहे. फॉरेन्सिक विश्‍लेषणासाठी चव्हाण यांची कार ताब्यात घेतली आहे. परिसरातील सीसीटीव्हीचे फुटेज पाहिले जात आहे. चव्हाण यांच्या नातेवाइकांनी तिघांवर संशय व्यक्त केला आहे. त्यापैकी दोघांना ताब्यात घेतले आहे. तिसरा संशयितही रात्रीपर्यंत ताब्यात येईल. वेगवेगळ्या दृष्टीने तपासासाठी पाच पथके स्थापन केली आहेत. लवकरच गुन्हा उघडकीस येईल.
- डॉ. शिवाजी राठोड, पोलिस अधीक्षक, लातूर

Web Title: killed a owner of coaching class in latur