प्रबोधनकार ते आदित्य, ठाकरे कुटुंबातील चौथी पिढी काय करते? वाचा....

विकास देशमुख
Friday, 24 January 2020

ठाकरे कुटुंबातील चौथ्या पिढीतील सदस्य काय करतात, याचा eSakal.com ने घेतलेला धांडोळा. 

औरंगाबाद - महाराष्ट्राच्या राजकारणात ठाकरे कुटुंबीयांचे अढळ स्थान आहे. उद्धव ठाकरे आता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. या कुटुंबातील चौथ्या पिढीतील आदित्य ठाकरे यांच्या रूपाने पहिल्यांदाच कुणी सदस्य विधानसभेत पोचला. त्यामुळे ठाकरे कुटुंब चर्चेत आले. आता 'राजपुत्र' अमित ठाकरेही राजकारणात सक्रिय झाले आहेत. त्या अनुषंगाने ठाकरे कुटुंबातील चौथ्या पिढीतील कोण-कोण आहे, ते काय करतात, याचा eSakal.com ने घेतलेला धांडोळा. 

प्रबोधनकार ठाकरे 

केशव सीताराम ठाकरे ऊर्फ प्रबोधनकार ठाकरे हे पत्रकार, समाजसुधारक, वक्ते, संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे पुढारी होते. शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे आणि श्रीकांत ठाकरे यांचे ते वडील होत. रायगड जिल्ह्यातील पनवेल येथे जन्मलेल्या प्रबोधन ठाकरे यांचे महात्मा फुले हे आदर्श होते.

महात्मा फुलेंच्या क्रांतिकारी साहित्याचा अभ्यास केल्यानंतर समाजसुधारणांबाबतच्या त्यांच्या संकल्पना अधिक स्पष्ट झाल्या. म्हणूनच महात्मा फुले यांचा पुण्यातील कट्टर सनातन्यांकडून छळ झाल्यानंतरच्या काळात त्यांचा लढा पुढे चालविण्यासाठीच प्रबोधनकार पुण्यात स्थायिक झाले. या कार्यात त्यांच्या विरोधकांनी आणलेले अडथळे पार करत त्यांनी साऱ्यांची दाणादाण उडवून दिली. 

बाळासाहेब ठाकरे आणि श्रीकांत ठाकरे 

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची एवढीच ओळख नाही तर राजकारणी असण्याबरोबरच ते सिद्धहस्त व्यंगचित्रकार होते. सामना हे दैनिक आणि मार्मिक या साप्ताहिकाचे ते संस्थापक, तसेच प्रमुख संपादकही होते. त्यांना आयुष्यभर मीनाताई यांनी खंबीर साथ दिली. बाळासाहेब आणि मीनाताई यांची उद्धव, बिंदुमाधव आणि जयदेव ही तीन मुलं. त्यापैकी आज बिंदुमाधव हयात नाहीत. 

बाळासाहेबांचे भाऊ श्रीकांत ठाकरे हे एक अत्यंत गुणी संगीतकार होते. ज्यांच्या संगीत नियोजनात प्रख्यात हिंदी गायक मोहम्मद रफी यांनी मराठी गाणी गायली होती. ती सर्व गाणी अजूनही अतिशय लोकप्रिय आहेत. श्रीकांत हे राज ठाकरे यांचे वडील होत. 
 

Image may contain: 5 people, people smiling, people standing and beard

ही आहे ठाकरे कुटुंबाची चौथी पिढी 

  • नेहा बिंदुमाधव ठाकरे 
  • निहार बिंदुमाधव ठाकरे 
  • जयदीप जयदेव ठाकरे 
  • राहुल जयदेव ठाकरे 
  • ऐश्वर्य जयदेव ठाकरे 
  • माधुरी जयदेव ठाकरे 
  • आदित्य उद्धव ठाकरे 
  • तेजस उद्धव ठाकरे 
  • उर्वशी राज ठाकरे 
  • अमित राज ठाकरे 

Image may contain: 3 people, people smiling

कोण काय करतो? 

ठाकरे कुटुंबाच्या चौथ्या पिढीतील सदस्यांपैकी केवळ सध्या आदित्य ठाकरेच सक्रिय राजकारणात आहेत. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ते निवडून आले. तेजस ठाकरे हे आदित्य यांचे लहान बंधू आहेत. नुकतीच त्यांनी सापाची एक दुर्मिळ प्रजाती शोधून काढली. आपल्या वडिलांप्रमाणे तेजस यांनाही फोटोग्राफीचा छंद आहे. त्यांना निसर्गात रमणे आवडते. आरे कॉलनी वाचवण्यासाठी त्यांनी ऑनलाइन आंदोलनही केले होते. 

थरार - Video : अखेर असा पकडला बिबट्या : पहा Photos

नेहा ठाकरे या ज्वेलरी डिझायनर आहेत. त्यांचे वडील बिंदुमाधव चित्रपट निर्माता होते. त्यांच्या निधनानंतर पत्नी माधवी यांनी मुलगी नेहा आणि मुलगा निहार यांना घेऊन मातोश्री सोडले. नेहा यांचे पती प्रसिद्ध डॉक्‍टर आहेत. निहार हे व्यावसायिक आहेत. 

Image may contain: 3 people, people standing

राहुल ठाकरे हे जयदेव ठाकरे यांचे पुत्र आहेत. त्यांनी स्वतःला राजकारणापासून दूर ठेवले. आपले वडील जयदेव ठाकरे यांचा व्यवसाय ते सांभाळतात. आदिती यांच्याशी त्यांचा प्रेमविवाह आहे. त्यांचे बंधू ऐश्वर्य, जयदीप आणि बहीण माधुरी बद्दल फारशी माहिती उपलब्ध नाही. 

अमित राज ठाकरे हे आता राजकारणात सक्रिय झाले आहेत. मनसेच्या अनेक आंदोलनात त्यांनी भाग घेतला आहे. विधानसभा निवडणुकीत त्यांनी पक्षाचा प्रचारही केला. आता राज ठाकरे यांनी त्यांना राजकारणात पुढे आणण्याचे ठरवले आहे. त्यांच्या भगिनी उर्वशी याही नेहमीच राजकीय कार्यक्रमात दिसतात. त्यांनीही विधानसभा निवडणुकीमध्ये मनसेचा प्रचार केला होता. 

हेही वाचा - पंकजा मुंडेंची पोस्ट केवळ समर्थकांना भावनिक आवाहन 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Know About Fourth Generation of Thackeray Family