कोविडचा मृत्यूदर कमी करावा, आरोग्य‍ मंत्र्यांचे परभणीत निर्देश  

press
press

परभणी : कोरोनाची लागण झाल्यानंतर उपचारासाठी वेळेत रुग्णालयात दाखल न झाल्याने जिल्ह्यातील मृत्यूचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनामधील रुग्णांचा मृत्यूदर कमी करण्यासाठी आरोग्य यंत्रणेने संपर्कात आलेल्या संशयित व्यक्तींची तातडीने चाचणी करुन जिल्ह्यातील कोविडचा मृत्यूदर कमी करावा, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी (ता.१९) संबंधितांना दिले. 

जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात कोरोना आढावा बैठकीचे आयोजन केले होते. याप्रसंगी ते बोलत होते. बैठकीस खासदार फौजिया खान, आमदार बाबाजानी दुर्राणी, आमदार डॉ. राहुल पाटील, आमदार रत्नाकर गुट्टे, आमदार मेघना बोर्डीकर- साकोरे, आरोग्य सभापती अंजली आणेराव, जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी.पी., पोलिस अधीक्षक जयंत मीना, महापालिका आयुक्त देविदास पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. 

जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्तीश: लक्ष घालावे
सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री टोपे म्हणाले, जिल्ह्यातील कोरोना मधील रुग्णांचा मृत्यूदर कमी करण्यासाठी बाधित व्यक्ती ज्या व्यक्तींच्या संपर्कात आलेला आहे त्या सर्वांची चाचणी करावी. यासाठी चाचण्यांची संख्या वाढविणे गरजेचे असल्याचे सांगून याबाबत आरोग्य यंत्रणेने योग्य ती खबरदारी घ्यावी. आरोग्य विभागातील सर्व डॉक्टरांनी कोविडमध्ये तत्परतेने काम करावे. याकामी जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्तीश: लक्ष घालावे. तसेच या आपत्तीच्या पार्श्वभूमीवर डॉक्टरांचा अभाव असता कामा नये. यासाठी डॉक्टर्स, नर्स कमी पडत असल्यास ते कंत्राटी तत्वावर थेट मुलाखतीच्या माध्यमातून नियुक्ती करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी नियमितपणे प्रक्रिया राबवावी. परंतू, कोरोनाच्या रुग्णाचा मृत्यू होणार नाही याची काळजी घ्यावी, अशा सुचनाही त्यांनी यावेळी केल्या. 

वॉररुम उपक्रमाचे कौतूक 
‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेअंतर्गत जिल्ह्यात चांगले काम झाले आहे असे सांगून जिल्हाधिकारी कार्यालयात कोविड सेवेसाठी २४ तास वॉररुम उपक्रम उपलब्ध असल्याने याचे मंत्री महोदयांनी कौतूक केले. तसेच टेली आयसीयुही बसवावेत, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. जिल्ह्यातील कोविडबाबतची सर्व माहिती नियमितपणे डॅशबोर्डवर अपलोड करावी जेणेकरुन कोविडविषयक माहिती सर्वांना उपलब्ध होईल. टेस्ट पर मिलियन वाढविणे गरजेचे असून शंभर टक्के डॉक्टरांना कोविडमध्ये काम करण्यासाठी समाविष्ट करावे. तसेच या आपत्तीच्या कालावधीत आयएमएच्या डॉक्टरांनी सहकार्य करावे, असे सांगून महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेमध्ये सर्व सोयी-सुविधांनी परिपूर्ण अशा रुग्णालयांचा समावेश असल्याने त्याचा फायदा सर्व नागरिकांना मिळवून द्यावा, असेही श्री.टोपे यांनी या वेळी सांगितले. 

परभणी जिल्ह्यातील मृत्यूदर चिंताजनक ; आरोग्यमंत्री टोपे
परभणी ः जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग आता कमी होताना दिसत असला तरी कोरोनामुळे मृत्यूचा आकडा चिंता वाढविणारा असल्याची खंत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली. येथे सोमवारी (ता. १९) आढावा घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना टोपे म्हणाले, कोरोनामुळे राज्याचा मृत्यूदर २.६ असा आहे. तुलनेत परभणी जिल्ह्याचा मृत्यूदर ४.१ एवढा आहे. निश्चितच तो चिंताजनक आहे. कोविड सेंटरमधून दाखल झालेल्या रुग्णांपैकी एका दिवसात किंवा तीन दिवसांतच मृत्यू झालेल्यांचे प्रमाण या जिल्ह्यात अधिक दिसते. लक्षणे आढळल्यानंतर रुग्णालयांमधून चाचणी किंवा उपचारासाठी यातील बहुतांश रुग्णांनी विलंब केला, असे कारण समोर येत आहे. त्यामुळेच आरोग्य विभाग, जिल्हा प्रशासनातर्फे जनजागृतीची नितांत गरज आहे. खासदार प्रा. फौजिया खान, आमदार डॉ. राहुल पाटील, जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी.पी., पोलिस अधीक्षक जयंत मीना, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे, महापालिका आयुक्त देविदास पवार आदी उपस्थित होते. 


संपादन ः राजन मंगरुळकर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com