नव्या रस्त्यावर आणखी 16 कोटींचा स्मार्ट मुलामा 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 मे 2019

काही वर्षांपूर्वीच सुमारे 30 कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या क्रांती चौक ते रेल्वेस्टेशन रस्त्यावर आता 16 कोटींचा स्मार्ट मुलामा दिला जाणार आहे.

औरंगाबाद - काही वर्षांपूर्वीच सुमारे 30 कोटी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेल्या क्रांती चौक ते रेल्वेस्टेशन रस्त्यावर आता 16 कोटींचा स्मार्ट मुलामा दिला जाणार आहे. त्यासाठी शहर अभियंत्यांच्या खांद्यावर आता स्मार्ट रोडची धुरा सोपविण्यात आली आहे. या रस्त्यावर होणाऱ्या खर्चावरून यापूर्वीच न्यायालयाने महापालिकेवर नाराजी व्यक्त केली होती. 

स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत स्मार्ट रोडस्‌ ही संकल्पना राबविण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यानुसार क्रांती चौक ते रेल्वेस्टेशन, रेल्वेस्टेशन ते महावीर चौक व महावीर चौक ते क्रांती चौक असे वर्तुळ स्मार्ट रोडअंतर्गत विकसित केले जाणार होते. त्यासाठी सुमारे 36 कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय स्मार्ट सिटी संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला होता. विशेष म्हणजे क्रांती चौक ते रेल्वेस्टेशन या रस्त्यावर काही वर्षांपूर्वीच सुमारे 30 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. शहरातील इतर भागांत रस्त्यांची मोठी दुरवस्था असताना या एकाच रस्त्यावर उधळपट्टी कशासाठी? असा प्रश्‍न त्या वेळी अनेकांनी केला. दरम्यान, न्यायालयाने देखील नाराजी व्यक्त केल्यानंतर पदाधिकाऱ्यांनी हा निधी घटवून आता 16 कोटींवर आणला आहे. क्रांती चौक ते रेल्वेस्टेशनपर्यंच्या रस्त्याचे सोळा कोटींत सौंदर्यीकरण केले जाणार आहे; तसेच शहरातील प्रमुख वारसास्थळांचे संवर्धन व सौंदर्यीकरणाचे कामही स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या माध्यमातून केले जाणार आहे. यासाठी प्राथमिकस्तरावर पन्नास लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 

नोडल अधिकारी म्हणून  पानझडे यांची निवड 
रस्ते आणि वारसास्थळांच्या कामांसाठी नोडल ऑफिसर म्हणून शहर अभियंता सखाराम पानझडे यांची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतल्याचे महापौर नंदकुमार घोडेले यांनी सांगितले. शहर अभियंता विभागासाठी कर्मचारी उपलब्ध नाहीत. त्यामुळे रस्ते आणि वारसास्थळांच्या कामासाठी नियुक्त केलेल्या "पीएमसी'चे कर्मचारी या विभागासाठी मदतनीस म्हणून दिले जाणार आहेत. 

Web Title: kranti chowk to railway station aurangabad