भाजप सरकारनं थांबवलं होतं मराठवाड्यातल्या या प्रकल्पाचं काम...

Osmanabad News
Osmanabad News

उस्मानाबाद : कृष्णा मराठवाडा प्रकल्पाचे काम थांबण्यासाठी भाजप सरकारच कारणीभूत आहे. त्यांच्या काळात काही कामांना स्थगिती दिल्याने मंजूर झालेल्या निधीपैकी तब्बल सव्वाशे कोटी निधी खर्च झाला नसल्याचा आरोप उस्मानाबाद-कळंबचे आमदार कैलास घाडगे पाटील यांनी केला आहे.

महाविकास आघाडी सरकारकडे त्यांनी भाजपने घेतलेली स्थगिती उठवून कामाचा वेग वाढविण्याची मागणी अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली. महाविकास आघाडीवर सातत्याने स्थगिती सरकार असा आरोप करणाऱ्या भाजपवरच आमदार घाडगे पाटील यांनी पलटवार केल्याने हा प्रकल्प पुन्हा एकदा चर्चेत आल्याचे दिसून येत आहे.

आमदार घाडगे पाटील हे अर्थसंकल्पीय अधिवेशनात पुरवणी मागण्यांच्या चर्चेत सहभागी होत या विषयावर बोलत होते. त्यावेळी त्यांनी थेट भाजपवर निशाणा साधला. गेल्या काही वर्षांपासून या प्रकल्पाला निधी मिळत नसल्याचे दिसुन आले होते. भाजप सरकारने या प्रकल्पासाठी रखडलेल्या तांत्रीक अडचणी दुर केल्याचे सांगत होते. 

या अडचणी दुर केल्याने प्रकल्पाची गती वाढणार असल्याची तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही जाहीर घोषणा केली होती. एवढेच नाही, तर या प्रकल्पाला निधी कमी पडु दिला जाणार नसल्याचा शब्दही श्री. फडणवीस यांनी दिला होता. प्रत्यक्षात त्यांच्या कार्यकाळात या प्रकल्पाला पुरेसा निधी मिळाला नसल्याचेही दिसुन आले होते.

आमदार घाडगे पाटील यांनी बोलताना त्याविषयी सांगितले की, मागच्या सरकारने गेल्या अर्थसंकल्पात या प्रकल्पासाठी ३७५ कोटी रुपये निधी दिला होता, त्यातील सव्वाशे कोटी अखर्चित राहिले. सरकारच्या चुकीच्या धोरणाचा फटका या प्रकल्पाला बसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. अनेक कामाना स्थगिती दिल्याने हा निधी खर्च होऊ शकला नसल्याचे कारण देखील आमदार घाडगे पाटील यानी सभागृहात दिले. 

महाविकास आघाडीच्या सरकारने कृष्णा मराठवाडा प्रकल्पासाठी सर्वाधिक ८४० कोटी रुपयांची तरतुद केल्याचे त्यानी सांगितले. पण हा निधी खर्च करण्यासाठी अगोदरच्या सरकारने कामावर लावलेल्या स्थगिती उठविण्याची आवश्यकता असल्याचे त्यानी सांगितले. स्थगिती उठविल्यास या प्रकल्पाची गती वाढणार असुन हा निधी खर्च होण्यासाठी मार्ग मोकळा होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मराठवाड्याच्या अत्यंत महत्वाच्या व जिव्हाळ्याच्या प्रकल्पाबद्दल पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जिल्ह्यासाठी वरदान ठरणारा कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्प व या प्रकल्पासाठी गेल्या वर्षीची व चालू वर्षीची आर्थिक तरतूद पूर्ण क्षमतेने खर्च करण्याची मागणी करताना आमदार घाडगे पाटील यानी भाजप सरकारच्या धोरणावरही अप्रत्यक्षपणे टोला लगावत या प्रकल्पाबद्दल नव्याने चर्चा घडवुन आणली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com