रिटेकचीही गरज पडू नये एवढा सराव!

रिटेकचीही गरज पडू नये एवढा सराव!

कुस्ती प्रशिक्षक बिष्णोई यांनी उलगडले आमिरच्या ‘दंगल’ची गुपिते

औरंगाबाद - शरीर आणि बुद्धीचा कस लावणाऱ्या महिला कुस्तीला ‘दंगल’ चित्रपटाने नवे ग्लॅमर दिले. आमिर खान आणि या चित्रपटातील सगळ्याच कलाकारांनी कुस्तीचा एवढा सराव केला, की चित्रीकरणादरम्यान त्यांना रिटेकची गरजच पडली नाही. स्क्रिप्टपेक्षा जास्त कुस्ती सिनेमात दाखवणे, ही बाब या चित्रपटाला नव्या उंचीवर घेऊन गेल्याचे आमिरला प्रशिक्षण देणारे, अर्जुन पुरस्कार विजेते कृपा शंकर बिष्णोई यांनी ‘सकाळ’ला सांगितले.

फोन वाजला आणि समोरून आवाज आला, की ‘आमिर खान आपल्याला भेटू इच्छितात’. मित्रांपैकी कोणी टिंगल करत असल्याचे वाटल्याने मी संभाषण तोडले. पुन्हा आठवडाभराने फोन आल्यावर या चित्रपटाबाबत माहिती देण्यात आली अन्‌ माझा त्यावर विश्वास बसला. माझ्या सवडीने त्यांनी भेट घेतली आणि हा प्रवास सुरू झाल्याचे कृपा शंकर बिष्णोई यांनी सांगितले. भारतीय महिला कुस्ती संघाला प्रशिक्षण देत असल्याने आपल्याला यासाठी सवड आणि आवश्‍यक परवानग्या नव्हत्या. त्यासाठीचे काम झाल्यावर ‘दंगल’च्या निर्मितीलाही प्रारंभ झाला. आमची भेट होण्यापूर्वी आमिर आणि त्यांच्या चमूने कुस्तीच्या आखाड्यात उतरण्यापूर्वी जबरदस्त अभ्यास केल्याचे लक्षात आल्यावर मीही अवाक्‌ झालो, असे बिष्णोई म्हणाले. 

माहिती, डाव आणि सराव

प्रत्यक्ष प्रशिक्षणाला एप्रिल २०१५ मध्ये सुरवात झाली. कलाकार म्हणून कुस्तीगिराची भूमिका निभावणाऱ्यांवर मला पूर्ण भरवसा नव्हता; मात्र त्यांचा ध्यास आणि शिकण्यासाठीचे वेडेपण पाहिले, की माझे मत बदलले. प्रत्येकवेळी डावाची तोंडी माहिती सांगत, हे प्रशिक्षण पूर्ण करायचे होते. या कलाकारांना दुखापत होऊ नये याची खबरदारी घेताना हा प्रवास लांबला असल्याचेही त्यांनी यावेळी प्रांजळपणे नमूद केले.

९७ किलो वजनासह कुस्तीत उड्या
आमिर यांनी ९७ किलो वजनासह आपल्या मुलीसह आखाड्यात कुस्ती लढल्याचे चित्रीकरण ‘दंगल’मध्ये करण्यात आले आहे. यात आमिर यांना पाय धरल्यावर स्वतःची सुटका करण्यासाठी खूप उड्या माराव्या लागल्या. एवढ्या वजनासह असा सीन एकाही रिटेकशिवाय करणे सोपी बाब नाही आणि यातून त्यांची शारीरिक क्षमता दिसून येते, असे बिष्णोई सांगतात. या चित्रपटात फातेमा सना शेख, सानिया मल्होत्रा आणि जायरा वसीम यांनीही प्रशिक्षणात झोकून दिले होते. फातेमाने प्रशिक्षणादरम्यान झालेल्या फ्रॅक्‍चरकडेही लक्ष दिले नाही. यातूनच त्यांना कुस्तीचे प्रशिक्षण घेण्याचे कसे वेड लागले होते, हे सिद्ध होते, असे त्यांनी आवर्जून सांगितले.

गुरु-शिष्यांचे नाते
कुस्तीत गुरु-शिष्यांच्या परंपरेला मोठा मान आहे. आमिरनेही या परंपरेचा आदर राखत आपल्याला गुरू मानले. आमिर खान यांनी आपल्याला गुरू मानत चरणस्पर्श केला. यातून त्यांचे खेळाप्रति असलेले समर्पण दिसले. सकाळी तीन आणि सायंकाळी दोन तास हे कलाकार कुस्तीचे प्रशिक्षण घेण्यात व्यग्र झाले होते. यादरम्यान, आमिर यांनी धूम्रपानाचा त्याग केल्याचेही बिष्णोही यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com