कुंभारांच्या व्यवसायावर गुजराती भांड्यांचे संकट!

राजेभाऊ मोगल
मंगळवार, 10 एप्रिल 2018

राज्यातील कुंभार आजही मोठ्या मेहनतीने आपला व्यवसाय करीत आहे. एक तर आम्हाला शासनाकडून कुठलीही मदत मिळत नाही. दुसरीकडे गुजरात, राज्यस्थानसह अन्य राज्यांतून मोठ्या प्रमाणात मातीची भांडी आयात केली जात असल्याने पारंपरिक व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. विशेष म्हणजे आयात करून विक्री करणारेदेखील बहुतांश लोक हे परराज्यांतीलच आहेत. 
- सोमनाथ बरांडे, पारंपरिक व्यवसाय करणारे कुंभार

औरंगाबाद - आधुनिकीकरणामुळे बारा बलुतेदारीसह असंख्य बदल होत असून स्थानिकांच्या रोजगारावर गदा येत असल्याचे चित्र सभोवताली पाहायला मिळत आहेत. उन्हाळ्याची चाहूल लागताच घराघरांत पिण्याच्या पाण्यासाठी मातीचा माठ आणला जातो. यामुळे स्थानिक पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या कुंभार बांधवांना वर्षभर रोजगार मिळत असे; मात्र काळाच्या ओघात गुजरातसह अन्य ठिकाणांहून वस्तू आयात होत असल्याने कुंभाराच्या रोजगारावर मोठा परिणाम झाला आहे. 

लोकांच्या गरजा लक्षात घेऊन कुंभार वर्षभर मातीच्या भाड्यांची तयारी करीत असत. मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने वर्षभर त्यातून रोजगार मिळायचा. मात्र, आता लोकांच्या पसंतीनुसार मातीचे भांडे हे अन्य भागांतून आयात होत असल्याने स्थानिकांच्या रोजगारावर कुऱ्हाड कोसळली आहे. 
मातीच्या भाड्यांचा व्यवसाय करणारे शेख मकीम म्हणाले, आम्ही गेल्या बारा वर्षांपासून मातीची भांडे विकण्याचा व्यवसाय करीत आहोत. सध्याचा झगमगाटाचा जमाना आहे. लोकांच्या आवडी अगदी त्याप्रमाणेच झाल्या आहेत. अनेकजण मातीचे काळे माठच हवे, असा आग्रह धरत असत; मात्र मागील काही वर्षांपासून लाल रंगाच्या केळ्या, माठ यासह अन्य भांडीही सर्वत्र दाखल झाली आहेत. लाल रंगाचे भांडे हे अहमदाबादेतून आयात केले जात आहेत. ते दिसायला चकाचक असतात म्हणून ते लोकांच्या पसंतीस पडतात; मात्र त्यापेक्षा आपल्या मातीतील काळे भांडेच अधिक टिकाऊ असतात, हे सांगण्याची आता वेळ आली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी जुने लोक काळे माठच मागतात. हे माठ शहरासह परभणी, नांदेड येथून आणले जातात. काळाची पाऊले ओळखून आपल्या मातीच्या भांड्यालादेखील वेगळी ओळख निर्माण करून द्यायला हवी, यासाठी प्रयत्न करायला हवे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्‍त केली.

 

Web Title: kumbhar society business gujrathi pot disaster