esakal | घरी जाता येईना अन्‌ कामही बंद 
sakal

बोलून बातमी शोधा

घनसावंगी : शेतात वास्तव्य केलेले राजस्थानातील मजूर.

लॉकडाउनमुळे राजस्थान येथील मजुरांना घरी पण जाता येईना आणि कामही करता येईना. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. 

घरी जाता येईना अन्‌ कामही बंद 

sakal_logo
By
सुभाष बिडे

घनसावंगी (जि. जालना) -  लॉकडाउनमुळे राजस्थान येथील मजुरांना घरी पण जाता येईना आणि कामही करता येईना. त्यामुळे हातावर पोट असणाऱ्या मजुरांवर उपासमारीची वेळ आली आहे. 

राजस्थानातील अनेक कामगार दरवर्षी पोटाची खळगी भरण्यासाठी महाराष्ट्रात येत असतात. ते या ठिकाणी माळवद काम, विहिरीचे काम, इतर प्रकारची कामे करणारे अनेक कामगार घनसावंगी तालुक्‍यातील ग्रामीण भागात सध्या वास्तव्यास आहेत.

हेही वाचा : मिळाले तर दोन घास खायचे, चालत राहायचे... 

एका ठिकाणचे काम संपले की दुसऱ्या ठिकाणी कामासाठी जाऊन तेथे मुक्काम करतात. ज्यांच्याकडे काम आहे असे नागरिक त्यांची राहण्याची व्यवस्था करतात. असेच विहिरीची कामे करणारे राजस्थान राज्यातील दंतेडी (जि. भिलवाडा) येथील आसाराम वेनाजी साळवी व त्यांचे १३ सहकारी पाच महिन्यांपूर्वी महाराष्ट्रात आले होते, परंतु यावर्षी कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे राज्यात लॉकडाउन व संचारबंदी लागू झाल्याने सर्वच कामे बंद पडली आहेत. यात विहिरीचे काम अपवाद नाही. आसाराम साळवी व त्यांचे सहकारी विहिरीचे काम करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करतात.

हेही वाचा : बांधकामे ठप्प झाल्याने कामगारांचे हाल

लॉकडाउनमुळे दीड महिन्यापासून विहिरीचे काम बंद पडले, तसेच वाढत्या पोलिसांच्या गस्तीमुळे कामे करता येईनात, तसेच जिल्हाबंदीमुळे कुठे जाताही येत नाही. रस्त्यांवर वाहनेही धावत नाहीत. काम बंद असल्याने ते सध्या रांजणी भागातील एका शेतात वास्तव्यास आहेत. येथील एका किराणा दुकानदाराने आतापर्यंत त्यांना उधार किराणा दिला, परंतु उधारी जास्त होत असल्याने तेपण आता किराणा देत नाहीत. विशेष म्हणजे या मजुरांसोबत महिला व एक दीड महिन्याचे बाळदेखील आहे.

हेही वाचा :  लॉकडाऊनमध्ये मजुरांच्या हाताला मिळणार काम

काम नसल्याने पैसा दिसत नाही. तसेच प्रशासन आमच्या घरी जाऊ देत नाही. शासनाच्या मोफत व माफक दरात रेशन मागण्यासाठी आमच्याकडे रेशनकार्ड नाही. त्याचबरोबर मोफत तांदूळ वाटपाचा विषय येतो तेव्हा बाहेरील राज्यातील असल्याने प्रशासनाचे त्यांच्याकडे दुर्लक्ष होते. अशा परिस्थितीत काय करावे हेच समजत नसल्याचे मजुरांचे म्हणणे आहे. 

लॉकडाउनमुळे विहिरींची कामे करता येत नाहीत. काम होत नसल्याने आम्हाला कुणी पैसेही देत नाही. त्यामुळे काय करावे हेच समजत नाही. त्यामुळे प्रशासनाने आमच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करावी किंवा आम्हाला राजस्थानला जाण्याची परवानगी द्यावी. 
- आसाराम साळवी, 
कामगार, राजस्थान