मराठवाडा : कृत्रिम पावसासाठी झेपावले विमान, ढगांचा अभाव

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 ऑगस्ट 2019

अनुकूल ढग नसल्याने 30 मिनिटे प्रयत्न करूनही क्‍लाऊड सीडिंग करता आले नाही. त्यामुळे पाऊस पडू शकला नाही. शनिवारी (ता. दहा) पुन्हा प्रयत्न करणार असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. 

औरंगाबाद - सरासरीपेक्षा कमी पाऊस झालेल्या मराठवाड्यात कृत्रिम पाऊस पाडण्याच्या प्रयोगासाठी शुक्रवारी (ता. नऊ) दुपारी एकच्या सुमारास शास्त्रज्ञ सोबत असलेले विमान आकाशात झेपावले. डॉपलर रडारकडून मिळालेल्या इमेजेसनुसार हे विमान औरंगाबादच्या पश्‍चिम भागात 40 ते 50 किलोमीटरवर ढगांमध्ये गेले. मात्र, अनुकूल ढग नसल्याने 30 मिनिटे प्रयत्न करूनही क्‍लाऊड सीडिंग करता आले नाही. त्यामुळे पाऊस पडू शकला नाही. शनिवारी (ता. दहा) पुन्हा प्रयत्न करणार असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. 

गेल्या काही वर्षांपासून दुष्काळाचा सामना करणाऱ्या मराठवाड्याला यंदाही पावसाने सुरवातीपासून हुलकावणी दिली. त्यामुळे यंदा कृत्रिम पाऊस पाडण्याचे महसूल विभागाने जाहीर केले होते. याअनुषंगाने विभागीय आयुक्‍त कार्यालयाच्या इमारतीवर रविवारपासून (ता. चार) डॉपलर रडार बसविण्याचे काम सुरू होते. दरम्यान, गुरुवारी (ता. आठ) रडारची यंत्रणा कार्यान्वित झाल्यानंतर शुक्रवारी कृत्रिम पावसाचा प्रयोग होणार असल्याचे जाहीर केले होते. यासाठी शुक्रवारी सकाळी 11 वाजता येथील चिकलठाणा आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानाचे आगमन झाले. 

विमानतळावर शास्त्रज्ञ आणि वैमानिकांचे महसूल उपायुक्‍त सतीश खडके, उपजिल्हाधिकारी मृणालिनी सावंत निंबाळकर यांनी स्वागत केले. विभागीय आयुक्‍तालयातील डॉपलर रडारच्या ठिकाणी असलेल्या कंट्रोल रूमकडून वैमानिकास आणि शास्त्रज्ञांना इमेजेस पाठविण्यात आल्या. त्यानंतर दुपारी एक वाजता कृत्रिम पाऊस पाडण्याच्या प्रयोगासाठी विमानाने आकाशात झेप घेतली. हे विमान औरंगाबाद शहराच्या पश्‍चिम भागात गेले असून, 40 ते 50 किलोमीटरवर असलेल्या ढगांवर मेघबीजारोपण करण्यासाठी झेपावले. मात्र, पाऊस पाडण्यासाठी आवश्‍यक ढग उपलब्ध नसल्याने 30 मिनिटे आकाशात घिरट्या घातल्यानंतर हे विमान पुन्हा विमानतळावर उतरले. 
 

कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी शुक्रवारचा हा "ड्राय रन' होता. विमान आलेले होते. त्यामुळे उपलब्ध माहितीच्या आधारे आकाशात झेप घेतली. मात्र, हवे तसे ढग नसल्यामुळे क्‍लाऊड सीडिंग करता आलेले नाही. अनुकूल ढग उपलब्ध होताच आपले प्रयत्न सुरूच राहणार आहेत. शनिवारी भारतीय हवामान विभागासह रडारच्या माध्यमातून सातत्याने माहिती घेणे सुरू राहील. पावसासाठी हवे तसे ढग मिळाले की कृत्रिम पाऊस पाडता येईल. 
- कान्हुराज बगाटे, मोहिमेचे संचालक तथा अतिरिक्‍त जिल्हाधिकारी. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lack of clouds for artificial rain