औषधं अन्‌ शस्त्रक्रियेचे साहित्य तुम्हीच घेऊन या! 

ghati
ghati

औरंगाबाद : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) वर्षभरात सात ते आठ लाख रुग्ण आसपासच्या दहा ते बारा जिल्ह्यातून येतात. येथील निष्णात तज्ज्ञ हजारोंच्या संख्येत किचकट, गुंतागुतीच्या जटील शस्त्रक्रीया यशस्वी करतात. मात्र, शस्त्रक्रियेसाठी आवश्‍यक असलेल्या साहित्याची घाटीत कमतरता जाणवत आहे. शस्त्रक्रियेसाठीची सुई, दोरा, बॅंडेज, हॅण्डग्लोज, कॉटनपासून प्लास्टरचे साहीत्य अशा 108 हुन अधिक साहीत्याचा तुटवडा सध्या घाटीत आहे. यामुळे रुग्ण व नातेवाईकांना आर्थिक भुर्दंड पेलावा लागत आहे. उपचार मोफत, पण साहीत्य विकत म्हणण्यासारखीच सद्यस्थिती आहे. 

मराठवाड्याची जीवनदायीनी समजल्या जाणाऱ्या घाटीत दरवर्षी सात ते आठ लाख रुग्णांची नोंदणी होते. तसेच 18 हजार प्रसुती तर 4 ते पाच हजार सिझेरीयन होतात. शिवाय दिवसाकाठी आठ ते दहा मोठ्या व गुंतागुंतीच्या शस्त्रक्रीयाही पार पडतात. सर्जरी विभागात 130 साहीत्यांची प्रामुख्याने गरज भासते. त्याची मागणी 2017-18 पासून घाटीने केली आहे. गेल्या वर्षभरात त्या सर्जिकल साहीत्यापैकी 22 साहीत्य मिळाले. त्यापैकी अर्धेअधिक आतापर्यंत संपले. तरी गेल्या चार महिन्यांपासून एकाही साहीत्याचा पुरवठा हाफकिन महामंडळाकडून घाटीला झालेला नाही. शस्त्रक्रीयेतील धागे, बॅण्डेज, कॉटन, प्लास्टरचे साहीत्य तसेच विविध प्रकारच्या ऑपरेशनसाठी लागण्याच्या महागड्या सामुग्रीचा, इम्प्लॉंटचा तुटवडा सुरुच आहे. त्यामुळे मोफत उपचाराच्या आशेने घाटीत येणाऱ्या रुग्णांना प्रसुतीसाठी हजार ते दिडहजार तर इतर शस्त्रक्रीयांसाठी अडिच ते चार हजारांचा केवळ सर्जीकल साहीत्याचा खर्च खिश्‍यातून करावा लागत आहे. 

उरल्या केवळ 121 औषधी 
आयसीयु, एमआयसीयुत लागणारी प्रतिजैविके, महागडी इंजेक्‍शन, साध्या सलाईनसह औषधींच्या तुटवड्याचा भारही रुग्णांच्या खांद्यावरच आला आहे. साडेतीन कोटी रुपये घाटीने हाफकिनला वर्ग केल्यानंतर सहा महिन्यांच्या कालावधीने औषधे यायला सुरुवात झाली. घाटीने 234 प्रकारची औषधांची मागणी केली होती. त्यापैकी घाटीत 146 औषधांचा पुरवठा झाला. मात्र, त्यापैकी महात्वाची व नेहमी लागणारी महागड्या 25 औषधी सध्या संपल्याने केवळ 121 औषधी घाटीत उपलब्ध आहेत. 

प्रसुती, सिझेरीयनला दिड-दोन हजारांचा खर्च 
जेएसएसके या केंद्रशासनाच्या योजनेतून आरोग्य उपसंचालक व महापालीकेच्या आरोग्य विभागाने प्रसुती व सर्जरीसाठी लागणाऱ्या साहीत्याचा पुरवठा करायला पाहीजे. मात्र, त्यांच्याकडून कोणतीही मदत मिळत नाही. सध्या सर्जीकल साहीत्याचा तुटवडा असल्याने साहित्य बाहेरुन आणावे लागतात. यावर्षी शासनाच्या ई-पोर्टलवर सर्व माहीती दिली आहे. त्यामुळे चालु वर्षात आवश्‍यक साहीत्य मिळेल असे स्त्रीरोग विभागप्रमुख डॉ. श्रीनीवास गडप्पा म्हणाले. 

प्रशासनाचे हवे लक्ष 
सध्या अनेक औषधी स्टॉकमध्ये आहेत. मात्र, त्या वॉर्डांपर्यंत पोचत नसल्याने रुग्णांना उपलब्ध होत नाहीत. उपलब्ध औषधी व साहीत्य नियमित वाटप होण्याची गरज आहे. त्यासाठी प्रशासनाकडून त्याकडे लक्ष ठेवण्याची गरज असल्याचे अनेक तज्ज्ञांनी "सकाळ'ला सांगितले. 

"हाफकिनकडे अत्यावश्‍यक 130 सर्जीकल साहीत्याची मागणी होती. त्यापैकी 22 प्रकारातील साहित्य गेल्या फेब्रुवारीपर्यंत मिळाले. त्यानंतर पुरवठा झालेला नाही. त्यामुळे अत्यावश्‍यक साहीत्याची स्थानिक खरेदी करत आहोत. तर काही साहीत्य महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून स्थानिक खरेदी करत असल्याने काहीसा दिलासा आहे.'' 
- डॉ. कानन येळीकर, अधिष्ठाता  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com