व्हॅन फसल्याने रस्त्यातच प्रसूती

मंगेश शेवाळकर
शनिवार, 8 जून 2019

हिंगोली : कळमनुरी तालुक्यातील उमराफाटा ते बोल्डाफाटा मार्गावर येहळेगाव येथे पुलाच्या कामासाठी काढण्यात आलेल्या वळण रस्त्यावर मुरुमच टाकला नसल्याने वाहने फसण्याचे प्रकार वाढले असून शनिवारी (ता. 8) सकाळी सात वाजता एका महिलेस आरोग्य केंद्रात नेत असतांनाच व्हॅन फसल्याने व्हॅनमध्येच प्रसूती झाल्याचा प्रकार घडला आहे. 

हिंगोली : कळमनुरी तालुक्यातील उमराफाटा ते बोल्डाफाटा मार्गावर येहळेगाव येथे पुलाच्या कामासाठी काढण्यात आलेल्या वळण रस्त्यावर मुरुमच टाकला नसल्याने वाहने फसण्याचे प्रकार वाढले असून शनिवारी (ता. 8) सकाळी सात वाजता एका महिलेस आरोग्य केंद्रात नेत असतांनाच व्हॅन फसल्याने व्हॅनमध्येच प्रसूती झाल्याचा प्रकार घडला आहे. 

कळमनुरी तालुक्यातील उमराफाटा ते बोल्डाफाटा या सुमारे वीस ते पंचेविस किलो मिटर अंतराच्या रस्त्याचे काम केले जाणार आहे. या रस्त्यावर उमराफाटा, हातमाली, कळमकोंडा, या जांभरून, वारंगा मसाई, सोडेगाव, नांदापूर, हारवाडी, म्हैसगव्हाण, बोल्डाफा आदी  गावे आहेत. या ठिकाणी येहळेगाव शिवारात पुलाचे बांधकाम केले जात आहे. यापुलाच्या बांधकामामुळे वाहतुक बंद होऊ नये  यासाठी वळण रस्ता काढला आहे. मात्र या वळण रस्त्यावर मुरुम टाकला नसल्याने वाहने फसण्याचे प्रमाण वाढले आहे.

या भागातील गावकऱ्यांना पोतरा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र  व बोल्डा रेल्वेस्टेशन येथे जाण्यासाठी बोल्डा फाटा येथे यावे लागते. मात्र मागील दोन दिवसांतील वादळी वाऱ्यासह पावसामुळे वाहने फसण्याचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे याभागील गावकऱ्यांची अडचण होऊ लागली आहे. 

दरम्यान, कळमनुरी तालुक्यातल नांदापूर येथील वर्षा विठ्ठल बोरकर (वय 22) यांना प्रसुतीच्या कळा येत असल्याने त्यांना आज सकाळी सात वाजता व्हॅनमधून पोतरा (ता. कळमनुरी) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले जात असतांना व्हॅन वळण रस्त्यावर फसली. मोठे प्रयत्न करूनही पुढे निघत नसल्यामुळे अडचण निर्माण झाली. अखेर व्हॅनमध्ये त्यांची सुखरुप प्रसुती होऊन त्यांना मुलगाही झाला आहे. त्यानंतर गावकऱ्यांनी दुसरे वाहन आणून  बाळ व त्याच्या आईला दुसऱ्या वाहनाने परत गावाकडे आणले. वळण रस्त्यावर मुरुम टाकला नसल्यामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप गावकऱ्यांतून केला जात आहे. सार्वजनीक बांधकाम विभागाने याकडे लक्ष देऊन पावसाळ्यात वाहतुक ठप्प होणार नाही यासाठी वळण  रस्त्यावर मुरुम टाकावा अशी मागणी केली जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: a lady delivers baby in van on road at Hingoli