'डीएमआयसी'मध्ये 60 एकरांत तलावांची निर्मिती - अपूर्व चंद्रा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 एप्रिल 2017

औरंगाबाद - शहराच्या औद्योगिक लौकिकात भर टाकणाऱ्या दिल्ली-मुंबई-इंडस्ट्रीअल कॉरिडॉर (डीएमआयसी)मधील वातावरण सुखकारक वाटावे, यासाठी व "डीएमआयसी'तील सौंदर्यीकरणाच्या दृष्टीने 50 ते 60 एकरांत पाच तलावांची निर्मिती करण्यात येणार आहे. राज्याचे उद्योग सचिव अपूर्व चंद्रा यांनी मंगळवारी (ता. 11) ही माहिती दिली.

स्मार्ट सिटीच्या अनुषंगाने अपूर्व चंद्रा शहरात आले होते. स्मार्ट सिटीसाठी स्थापन करण्यात आलेल्या "एसपीव्ही'च्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी सांगितले, की "डीएमआयसी'मध्ये लॅंडस्केप विकसित करण्यासाठी कन्सलटन्सी नियुक्‍त करण्यात आली आहे.

याशिवाय परिसरातील वातावरण तेथे जाणाऱ्यांना सुखकारक वाटावे, लोकांना फिरायला जाता यावे यासाठी 5 तलाव विकसित करण्यात येणार आहेत. 50 ते 60 एकर परिसरात हे तलाव तयार करून त्याच्या भोवतालचा हिरवळ फुलवली जाणार आहे. एक तलाव यंदाच्या पावसाळ्यापूर्वीच करण्यात येणार आहे. ग्रॅंड हयातसाठी डीएमआयसीमध्ये 25 एकर जागा देण्यात आली असल्याचे ते म्हणाले. काही उद्योजकांनी मंगळवारी (ता. 11) भेट घेतली. त्यांनी केंद्र सरकारने इलेक्‍ट्रॉनिक क्‍लस्टरसाठी 30 कोटी दिले असून, यासाठी राज्य शासनानेही आपला वाटा द्यावा, अशी मागणी केली. इलेक्‍ट्रॉनिक उद्योगांसाठी वाळूज येथे इलेक्‍ट्रॉनिक टॉवर उभारले जाणार असल्याचे उद्योग सचिवांनी या वेळी सांगितले.

पाण्याचा पुनर्वापर करण्यावर उद्योगांचा भर
एका प्रश्‍नाच्या उत्तरात त्यांनी सांगितले, की उद्योगांसाठी जायकवाडी धरणात राखीव ठेवलेले पाणी वापरले जाईल. याशिवाय गरज भासल्यास सिवरेज ट्रीटमेंट प्लॅंटमधून रिसायकल झालेले पाणी वापरणार आहोत. साधारणतः 20 ते 25 एमएलडी पाणी डीएमआयसीसाठी घेतले जाईल. याशिवाय डीएमआयसीमधील उद्योगही पाण्याचा पुनर्वापर करण्यावर भर देणारे असतील.

Web Title: lake generation in dmic