धुळे : वॉटर कप स्पर्धेत लामकानी, सार्वे प्रथम; मुख्यमंत्र्यांकडूनही गौरव 

खेमचंद पाकळे
रविवार, 12 ऑगस्ट 2018

सत्यमेव जयते वॉटर कप 2018 स्पर्धेत धुळे तालुक्‍यातून लामकानी, तर शिंदखेडा तालुक्‍यातून सार्वे गावाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्यांचा गौरव करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे येथील पुरस्कार वितरण सोहळ्यात मुख्यमंत्री निधीतून विजेत्या तीन गावांवर आर्थिक सवलतींचा वर्षाव केला आहे. 

लामकानी (जि. धुळे) : पाणी फाउंडेशनतर्फे लोकसहभागातून दुष्काळ मुक्तीसाठी जिल्ह्यात एप्रिल- मेमध्ये राबविण्यात आलेल्या सत्यमेव जयते वॉटर कप 2018 स्पर्धेत धुळे तालुक्‍यातून लामकानी, तर शिंदखेडा तालुक्‍यातून सार्वे गावाने प्रथम क्रमांक पटकावला आहे. त्यांचा गौरव करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे येथील पुरस्कार वितरण सोहळ्यात मुख्यमंत्री निधीतून विजेत्या तीन गावांवर आर्थिक सवलतींचा वर्षाव केला आहे. 

बाणेर (पुणे) येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलात वॉटर कप स्पर्धेतील विजेत्या गावांना पुरस्कार वितरणाचा सोहळा सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जलसंधारणमंत्री प्रा. राम शिंदे, पाणी फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अभिनेता अमीर खान, किरण राव, सत्यजीत भटकळ, आशुतोष गोवारीकर, सचिव एकनाथ डवले, प्रवीणसिंह परदेशी आदींच्या उपस्थितीत हा पुरस्कार वितरण सोहळा होत आहे. 

स्पर्धेत धुळे तालुक्‍यातून लामकानीने प्रथम, निमगूळने द्वितीय, तर जुनवणे गावाने तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकावले आहे. शिंदखेडा तालुक्‍यातून सार्वेने प्रथम, झिरवेने द्वितीय, तर रामी गावाने तिसरा क्रमांक पटकावला आहे. तालुक्‍यातून प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्या गावांना पाणी फाउंडेशनने दहा लाख रुपयांचे रोख पारितोषिक दिले आहे. त्यात मुख्यमंत्र्यांनी प्रथम क्रमांकासाठी मुख्यमंत्री निधीतून पाच लाख, द्वितीय क्रमांकासाठी पाच लाख, तर तृतीय क्रमांकासाठी तीन लाखांचे बक्षीस जाहीर केले. त्यामुळे धुळे व शिंदखेडा तालुक्‍यातील विजेत्या गावांना मुख्यमंत्री निधीच्या लाभासह प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या गावांना विकासासाठी भरीव निधी मिळाला आहे.

paani water cup

पाणी फाउंडेशनने यंदा प्रथमच दुष्काळाशी मुकाबला करणाऱ्या धुळे व शिंदखेडा तालुक्‍यांची स्पर्धेसाठी निवड केली होती. त्यात 74 गावांनी सहभाग नोंदविला. मुख्यमंत्र्यांनी विजेत्या गावांचा गौरव केल्याने धुळे व शिंदखेडा तालुक्‍यांचा लौकिकही राज्यात उमटला आहे. लामकानीतर्फे सरपंच धनंजय कुवर, भरत पाकळे, विजया पाटील, तर सार्वेतर्फे सरपंच स्मिता शरद पाटील, पद्माबाई सोनी, दोंडाईचा बाजार समितीचे संचालक शरद पंडीत पाटील यांनी पुरस्कार स्विकारला.

 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lamaqani Sarve First in Water Cup Competition felicitated by chief minister