भूसंपादन अधिकाऱ्यास चार वर्षे सश्रम कारावास 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 फेब्रुवारी 2017

उस्मानाबाद - शेतकऱ्यांना मावेजाचा धानादेश देण्यासाठी लाच घेतल्याप्रकरणी तत्कालीन उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी शोभा राऊत यांना जिल्हा सत्र न्यायालयाने चार वर्षे सश्रम कारावास, 50 हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली. 

उस्मानाबाद - शेतकऱ्यांना मावेजाचा धानादेश देण्यासाठी लाच घेतल्याप्रकरणी तत्कालीन उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी शोभा राऊत यांना जिल्हा सत्र न्यायालयाने चार वर्षे सश्रम कारावास, 50 हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली. 

तालुक्‍यातील कौडगाव परिसरात औद्योगिक वसाहतीसाठी शेतकऱ्यांची जमीन संपादित करण्यात आली. संपादित क्षेत्रात शेतकरी अर्जुन दत्तात्रय देशमाने यांचाही समावेश होता. त्यांच्या क्षेत्रातील फळझाडे व दगडी पौळ याचा संपादित क्षेत्रात समावेश करण्यात आला नव्हता. मावेजा देताना फळझाडे, दगडी पौळ याचाही समावेश करून रक्कम देण्याचा विनंती अर्ज देशमाने यांनी केला होता. त्यानंतर श्रीमती राऊत यांनी देशमाने व इतर शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या रकमेच्या पाच टक्के म्हणजे 39 हजार 200 रुपयांच्या लाचेची मागणी केली. या संदर्भात देशमाने यांनी 16 जुलै 2014 ला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. त्यानुसार या विभागातील अधिकाऱ्यांनी सापळा रचून श्रीमती राऊत यांना 39 हजार 200 रुपयांची लाच स्वीकारताना पकडले होते. त्यांच्याविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. जिल्हा व सत्र न्यायाधीश (क्र. चार) आर. एन. रोकडे यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी झाली. सरकारी पक्षातर्फे पाच साक्षीदार तपासण्यात आले. सरकारी पक्षाचा पुरावा, अतिरिक्त सरकारी वकील महेंद्र देशमुख यांचा युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने श्रीमती राऊत यांना चार वर्षे सश्रम कारावास, 50 हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा ठोठावल्याची माहिती अतिरिक्त सरकारी वकील महेंद्र देशमुख यांनी दिली. 

Web Title: Land acquisition officer for four years rigorous imprisonment