"मार्शल'वर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 मार्च 2017

बीड - दोन सुवर्ण व एक कांस्यपदक पटकावून पोलिस दलाची मान उंचावणाऱ्या बॉम्बशोधक पथकातील "मार्शल' या श्‍वानाचे बुधवारी (ता. 29) किडनीच्या आजाराने निधन झाले. त्याच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. 

बीड - दोन सुवर्ण व एक कांस्यपदक पटकावून पोलिस दलाची मान उंचावणाऱ्या बॉम्बशोधक पथकातील "मार्शल' या श्‍वानाचे बुधवारी (ता. 29) किडनीच्या आजाराने निधन झाले. त्याच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. 

सात वर्षे वय असताना पुणे येथून ता. एक नोव्हेंबर 2011 रोजी जिल्हा पोलिस दलाच्या श्‍वानपथकात मार्शल दाखल झाला होता. त्यावेळी त्याला पुणे येथील गुन्हे अन्वेषण विभागात प्रशिक्षण देण्यात आले. घातक स्फोटकांसाठी वापरल्या जाणाऱ्या रसायन व पदार्थ वासाने ओळखण्याचे तंत्र अवगत केल्यानंतर तो बॉम्बशोधक व नाशक पथकात कार्यरत झाला. 2012 मध्ये औरंगाबाद येथील विभागीय पोलिस कर्तव्य मेळाव्यात त्याने सुवर्णपदक पटकावले, तर 2014 मध्ये विभागीय मेळाव्यात सुवर्णपदक व राज्यस्तरीय मेळाव्यात कांस्यपदकाचा तो मानकरी ठरला होता. वर्षभरापूर्वीच त्याला किडनी आजाराने ग्रासले; मात्र उपचारानंतर तो बरा झाला होता; पण पुन्हा त्याची प्रकृती खालावली. पोलिस कल्याण भवनाच्या परिसरात त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अपर अधीक्षक वैभव कलुबर्मे, सहायक अधीक्षक नुरूल हसन, उपअधीक्षक गणेश गावडे यांनी त्याच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण केले. त्यानंतर हवेत तीन फैरी झाडून मानवंदना देण्यात आली. या वेळी बॉम्बशोधक व नाशक पथकाचे सहायक निरीक्षक जी. झेड. सय्यद, श्‍वानपथकाचे फौजदार मधुकर चांदेकर, निवृत्त फौजदार ए. डी. जोशी, जमादार आर. के. नेवडे, संजय खाडे, साजेद सिद्दिकी, एन. वाय. धनवडे, संतोष वजूरकर, बाबासाहेब करांडे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. 

Web Title: The last rites of state honors