लासूर स्टेशन बनले तालुक्‍याच्या राजकारणाचे सत्ताकेंद्र 

अविनाश संगेकर 
बुधवार, 22 मार्च 2017

लासूर स्टेशन - हर्सूल सावंगी या जिल्हा परिषद गटाच्या सदस्या ऍड. देवयानी कृष्णा पाटील डोणगावकर यांची अध्यक्षपदी निवड झाल्याने गटात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. अगोदरच गावाला गंगापूर पंचायत समितीचे उपसभापतीपद मिळाले असून, आता जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचा लाल दिवा मिळाल्याने ग्रामस्थ समाधानी आहेत. विकासाबाबत त्यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. 

लासूर स्टेशन - हर्सूल सावंगी या जिल्हा परिषद गटाच्या सदस्या ऍड. देवयानी कृष्णा पाटील डोणगावकर यांची अध्यक्षपदी निवड झाल्याने गटात आनंदोत्सव साजरा करण्यात आला. अगोदरच गावाला गंगापूर पंचायत समितीचे उपसभापतीपद मिळाले असून, आता जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाचा लाल दिवा मिळाल्याने ग्रामस्थ समाधानी आहेत. विकासाबाबत त्यांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. 

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेना व कॉंग्रेस एकत्र आल्याने सत्तेची सर्वच समीकरण बदलली. केवळ भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याच्या अजेंड्यावर एकत्र आलेल्या या नव्या समीकरणातून मात्र लासूरला अध्यक्षपद मिळाले आणि ग्रामस्थ, कार्यकर्त्यांतून आनंदोत्सव साजरा केला गेला. उच्चशिक्षित अशा ऍड. देवयानी डोणगावकर या दिवंगत माजी खासदार साहेबराव पाटील डोणगावकर यांच्या सुनबाई, शिवसेना नेते कृष्णा पाटील डोणगावकर यांच्या पत्नी तर भाजपचे केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या कन्या आहेत. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसला सोडचिट्टी देत नुकतेच शिवबंधन बांधलेले कृष्णा पाटील डोणगावकर अखेर पत्नीस जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद मिळवून देण्यात यशस्वी ठरले. या निवडीसाठी कृष्णा पाटील यांनी सर्व प्रतिष्ठा पणाला लावली होती. कृष्णा पाटील यांचा शिवसेना प्रवेश खऱ्या अर्थाने अध्यक्षपद मिळाल्यानंतर सफल झाला असेच म्हणावे लागेल. भाजपचे प्रवक्ते तथा आमदार प्रशांत बंब यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. जिल्ह्यात सर्वाधिक सदस्य निवडून आणण्यात यशस्वी झालेल्या आमदार बंब यांना गावाकडे लक्ष देण्यास वेळ मिळाला नाही आणि याच गावाने आता जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद व पंचायत समितीचे उपसभापतीपद शिवसेनेला मिळवून दिले. आगामी विधानसभेच्या शिवसेनेच्या उमेदवारीसाठी कृष्णा पाटील यांच्यासाठी ही भक्कम सुरुवात मानली जात आहे. दरम्यान नवनिर्वाचित अध्यक्ष ऍड. देवयानी डोणगावकर म्हणाल्या की, सर्व पदाधिकाऱ्यांना विश्‍वासात घेऊन जिल्ह्यातील समस्या सोडविण्याला प्राधान्य देत शाश्‍वत विकास घडवू. एकंदरीत लासूर स्टेशन हे आता जिल्ह्यातील महत्त्वाचे सत्ताकेंद्र बनले आहे. अगोदर आमदारकी, आता जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद व गंगापूर पंचायत समितीचे उपसभापतिपद असा तिहेरी मुकुट परिधान केलेल्या या गावातील ग्रामस्थ आता मोठ्या विकासात्मक घडामोडींच्या अपेक्षेत आहेत. या सर्व महत्त्वाच्या पदांमुळे गटाचे प्रश्न सुटण्यास मदतच होईल, असे बोलले जात आहे. 

सासरा, सासू, सुनेला जिल्हा परिषदेची सत्ता 

दिवंगत नेते, माजी खासदार साहेबराव पाटील डोणगावकर यांनी खासदार होण्यापूर्वी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद भूषविले होते. त्यानंतर त्यांच्या पत्नी इंदुमतीबाई डोणगावकर यांना जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपद मिळाले. आता त्यांच्या सुनबाई देवयानी डोणगावकर यांच्या रूपाने जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद पुन्हा घरात आले आहे. एका अर्थाने सासरा, सासू, व सुनेला जिल्हा परिषदेची सत्ता मिळविण्यात यश आले आहे. 

Web Title: lasur station politics center