लातूर जिल्ह्यात विद्यूत खांबावरून पडून लाईनमनचा दुर्दैवी मृत्यू

जलील पठाण
Monday, 1 February 2021

आपल्या कर्तव्यात चोख आणि प्रामाणिक असलेल्या तंत्रज्ञाचा असा अपघाती आणि दुर्दैवी मृत्यू झाल्याने सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे​

औसा (लातूर): तालुक्यातील खरोसा गावाचे रहिवाशी व आलमला येथे कार्यरत असणारे महावितरणचे वरिष्ठ तंत्रज्ञ प्रवीण आदिनाथ क्षीरसागर (वय ४०) वर्षे यांचा सोमवारी (ता.१) आलमला येथे विद्युत पुरवठ्यातील दुरुस्ती करतांना खांबावरून पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

या बाबत समजलेली माहिती अशी की, आलमला येथे कार्यरत असणारे महावितरण विभागाचे वरिष्ठ तंत्रज्ञ प्रवीण क्षीरसागर हे सोमवारी सकाळी नऊ वाजता विद्युत पुरवठ्यात असलेला बिघाड काढण्यासाठी परमिट घेऊन विद्युत पुरवठा बंद असलेल्या खांबावर चढले होते. काम करीत असताना त्यांचा तोल गेल्याने ते खाली पडले. जवळ असलेल्या लोकांनी त्यांना तातडीने उचलून लातूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी त्यांना तपासणीनंतर मृत घोषित केले.

आपल्या कर्तव्यात चोख आणि प्रामाणिक असलेल्या तंत्रज्ञाचा असा अपघाती आणि दुर्दैवी मृत्यू झाल्याने सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे. औसा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून पार्थिव नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. शोकाकुल वातावरणात खरोसा गावी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.  त्यांच्यात पश्चात आई, वडील, भाऊ पत्नी, दोन मुली असा परिवार आहे.

महावितरणकडे खांबावर चढणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या कमीच-
अलीकडे महावितरण विभागात भरती झालेल्या अनेक लाईनमन यांना खांबावर चढता येत नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर येत आहे. अनेक कर्मचाऱ्यांकडे खाजगी माणसे आहेत की जे खांबावर चढू शकतात.

महावितरण कुठेतरी आपल्या कामरचाऱ्यांना खांबावर चढण्याचे प्रशिक्षण देण्यात कमी पडत आहे आणि त्यांच्या या कामाबाबतच्या सुरक्षेकडे डोळेझाक करीत आहे. खांबावर चढल्यावर आशा कर्मचाऱ्यांना अपघात होऊनये व जीवित हानी टाळण्यासाठी अजूनही महावितरणची यंत्रणा तोकडीच असल्याचे या घटनेने समोर आणले आहे.

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Latur accident news unfortunate death of Lineman after falling from a power pole