लातूर : अंबाजोगाई तालुक्यात ‍शेतकऱ्यांवर ‘गोगलगाय’ वेचण्याची वेळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Latur Ambajogai farmers crops damage

लातूर : अंबाजोगाई तालुक्यात ‍शेतकऱ्यांवर ‘गोगलगाय’ वेचण्याची वेळ

अंबाजोगाई - एकीकडे पावसाअभावी पिके संकटात असताना अंबाजोगाई तालुक्यात सर्वत्र गोगलगायींचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी अचडणीत सापडले आहेत. कृषी विभागाने याबाबत प्रचार व मार्गदर्शन करण्यास सुरूवात केली आहे. या गोगलगायी उगवलेले सोयाबीन फस्त करीत असल्याने दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर आले आहे. शेतकऱ्यांना मजूर लावून शेतात खुरपणीपूर्वी गोगलगायी वेचाव्या लागत आहेत.

सद्यःस्थितीत तालुक्यातील जवळगाव, लिंबगाव, बर्दापूर, भारज, गित्ता, कुंबेफळ, दस्तगीर वाडी, मगरवाडी, गित्ता या गावांतील शेती शिवारात सोयाबीन पिकावर गोगलगायींचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. त्यामुळे यावर काय उपाययोजना कराव्यात यासाठी कृषी विभागामार्फत शुक्रवारी जवळगाव येथील मंदिरात शेतकऱ्यांचा मेळावा झाला. त्यात वसंतराव नाईक कृषी विद्यापीठाच्या येथील कृषी विस्तार केंद्राचे कृषी विद्यावेत्ता डॉ. वसंत सूर्यवंशी यांनी एकात्मिक पद्धतीने गोगलगायीचे व्यवस्थापनासंदर्भात शेतकऱ्यांना माहिती दिली.

तालुका कृषी अधिकारी सूर्यकांत वडखेलकर यांनी शेतकऱ्यांसोबत संवाद साधून शेतकऱ्यांचे अनुभव जाणून घेतले. तसेच गोगलगायींच्या व्यवस्थापनासाठी सामूहिक प्रयत्न करून उपाययोजना करण्याचे आवाहन केले. उपविभागीय तंत्रज्ञान समन्वयक शिवप्रसाद येळकर यांनी गोगलगाय व्यवस्थापनासाठी रासायनिक उपाययोजना करताना घ्यावयाची काळजी तसेच कुंबेफळ, नांदगाव येथील शेतकऱ्यांनी केलेल्या उपाययोजनांची माहिती व झालेले फायदे सांगितले. सूत्रसंचालन कृषी पर्यवेक्षक जयदीप गिराम यांनी केले.

शेतकऱ्यांनी काय करावे?

सकाळी लवकर शेतामध्ये जाऊन गोगलगायी वेचाव्यात. शेतामध्ये गुळाच्या पाण्यात भिजवलेले कलतानी पोते ठेवून त्याखाली जमा झालेल्या गोगलगायी वेचून मिठाच्या पाण्यामध्ये नष्ट कराव्यात. रासायनिक पद्धतीने गोगलगायीचे व्यवस्थापन करण्यासाठी मेटाल्डिहाईड २.५ टक्के गोळ्यांचा वापर करावा.

Web Title: Latur Ambajogai Farmers Crops Damage Snails Agriculture Department Guidance

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..