esakal | Latur: बैठकीनंतर मुख्यमंत्री मदत जाहीर करतील : शिक्षणमंत्री देशमुख
sakal

बोलून बातमी शोधा

Amit deshmukh

बैठकीनंतर मुख्यमंत्री मदत जाहीर करतील : शिक्षणमंत्री देशमुख

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

उस्मानाबाद : जिल्ह्यातील नुकसानीचा अहवाल व त्याचा तपशील मंगळवारपर्यंत राज्य सरकारला पाठवावा, असे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. यावर राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत चर्चा होईल. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मदत जाहीर करतील, असा विश्वास राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी व्यक्त केला आहे.

नुकसानग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर शनिवारी (ता. २) त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी माजी मंत्री मधुकरराव चव्हाण, आमदार कैलास घाडगे पाटील, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. यावेळी श्री. देशमुख म्हणाले, जिल्ह्यामध्ये अंदाजे दोन लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असून, दिडशे रस्ते खराब झाले आहेत. तसेच पुलांची देखील अशीच परिस्थिती झाली आहे. त्याच्या दुरुस्तीसाठी अपेक्षित निधी देण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक आहे. लवकरात- लवकर सदरील कामे हाती घेण्यात येतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तसेच पिकांच्या नुकसानीचा आकडा मोठा आहे, त्याचा तपशील घेण्याचे काम प्रशासन करत आहे. येत्या मंगळवारपर्यंत हा तपशील राज्य सरकारला मिळेल, असे आदेश दिल्याचे त्यांनी सांगितले. या तपशीलावर मंत्रीमंडळाच्या बैठकीत चर्चा होऊन त्यानंतर मदत देखील जाहीर होईल, अशी माहिती त्यांनी दिली.

पीकविमा कंपन्यांच्या जबाबदार लोकांशी प्रशासनाने संवाद साधून त्यांना प्रशासनाने केलेले पंचनामे ग्राह्य धरण्याबाबत विनंती केलेली आहे. यास त्यांनीही सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. यानुसार ऑनलाइन व ऑफलाईन माहिती कळविण्याचे काम चालु असल्याचे त्यांनी सांगितले. अनेक ठिकाणी घराचे नुकसान झाले असून, त्या सर्वांना मदतीचा हात राज्य सरकार देणार आहे. झालेल्या नुकसानीतून शेतकऱ्यांना पुन्हा उभारी देण्यासाठी राज्यसरकार कटिबद्ध असल्याचेही अमित देशमुख म्हणाले.

विमा न भरणाऱ्या लोकांनाही मदत

अस्मानी संकट असल्याने राज्य आपत्ती विभागाच्या अटी व निकषांमध्ये बदल करण्याचा विचार केला जाईल, ज्या-ज्या घटकांचे यामध्ये नुकसान झाले आहे. अशा सर्व घटकांना न्याय देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करणार असल्याचे श्री. देशमुख म्हणाले. विमा कंपन्याचा गेल्यावर्षीचा अनुभव कटू असला तरी यंदा त्यामध्ये काही सुधारणा करण्याचा आमचा मानस असून, त्यांना विश्वासात घेऊन सुरवातीपासून या प्रक्रियेकडे राज्य सरकार लक्ष देणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी विमा भरलेला नाही, अशाही लोकांना मदत व पुनर्वसन विभागाच्यावतीने मदत देण्यात येणार असल्याचे आश्वासन यावेळी श्री. देशमुख यांनी दिले.

loading image
go to top