esakal | Latur: नुकसानीचा अहवाल मंगळवारपर्यंत : पालकमंत्री अमित देशमुख
sakal

बोलून बातमी शोधा

पालकमंत्री अमित देशमुख

नुकसानीचा अहवाल मंगळवारपर्यंत : पालकमंत्री अमित देशमुख

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

लातूर : जिल्ह्यात २७ व २८ सप्टेंबरला झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे तीन लाख ३३ हजार ५२५ हेक्टरवरील पिकांना बाधा पोचली. तीन लाख ६९ हजार ३३१ शेतकऱ्यांचे नुकसान झाले. नुकसानीचे पंचनामे युद्ध पातळीवर सुरू असून, मंगळवारपर्यंत (ता. दोन) नुकसानीचा प्राथमिक अहवाल देण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या. बुधवारच्या (ता. तीन) मंत्रिमंडळ बैठकीत त्यावर चर्चा होऊन शेतकऱ्यांच्या पदरात लवकरच नुकसानीची भरपाई किंवा मदत पडेल, असा विश्वास पालकमंत्री अमित देशमुख यांनी शुक्रवारी (ता. एक) पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

श्री. देशमुख म्हणाले, ‘‘मागील पन्नास वर्षांत कमी कालावधीत एवढा मोठा पाऊस झाल्याची घटना पहिल्यांदाच घडली. सरासरीच्या १२८ टक्के पाऊस झाला. साठपैकी ४४ मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली. पावसामुळे आलेल्या पुरानंतर जिल्हा प्रशासनाने यशस्वी बचावकार्य केले. शेतीसोबत घरे, रस्ते, पूल, पायाभूत सुविधा, इमारतींचेही नुकसान झाले आहे. रस्ते व पुलांची युद्ध पातळीवर दुरुस्ती करण्याचे आदेश दिले आहेत.

हेही वाचा: पाथरीत विवाहितेचा संशयास्पद मृत्यू

पीक नुकसानीच्या भरपाईसाठी आतापर्यंत चार लाख शेतकऱ्यांनी अर्ज केले असून, ऑफलाइन अर्ज करण्यात अडचणी दूर करण्यात येत आहेत. अतिवृष्टी व पूरग्रस्तांना तातडीने मदत देण्याच्या सूचना दिल्या आहेत. शेतकऱ्यांच्या वेदना व भावनेशी सरकार एकरूप आहेत. शेतकऱ्यांना या अस्मानी संकटातून बाहेर काढण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे.’’ नुकसानीच्या प्राथमिक अंदाजावरून पीकविम्याची पंचवीस टक्के आगाऊ भरपाई शेतकऱ्यांना द्यावी, अशी अधिसूचना जिल्हा प्रशासनाने काढली आहे.

मागील तीन वर्षापासून प्रशासन ही अधिसूचना काढत असून, विमा कंपनीकडून आगाऊ भरपाई दिली जात नाही. यावर्षी तरी शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेऊन ही भरपाई द्यावी, असे पत्रकारांनी विचारताच विमा कंपनी टाळाटाळ करीत असेल तर राज्यस्तरावर या विषयावर चर्चा करण्यात येऊन कंपनीला आदेश देण्यात येतील, असे श्री. देशमुख यांनी सांगितले.

loading image
go to top