लातूरला "कमळ' फुलले; परभणीत "हाता'ला साथ 

लातूरला "कमळ' फुलले; परभणीत "हाता'ला साथ 

लातूर, परभणी - शहरांचा कारभार चालविणाऱ्या महापालिकांच्या निवडणुकीचे निकाल शुक्रवारी (ता. 21) जाहीर झाले. लातूरमध्ये "कमळ' फुलले असून, कॉंग्रेसला धक्का देत भाजपने स्पष्ट बहुमत मिळविले. परभणीत नागरिकांनी "हाता'ला चांगली साथ दिली असली, तरी कॉंग्रेसला सत्तास्थापनेसाठी दोघांची गरज भासणार आहे. अर्थात अपक्ष म्हणून निवडून आलेले दोघे कॉंग्रेसचेच बंडखोर असल्याने त्यांची मदत मिळण्याची शक्‍यता आहे. 

पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर (भाजप) आणि कॉंग्रेसचे आमदार अमित देशमुख यांच्यासाठी प्रतिष्ठेच्या ठरलेल्या लातूर महापालिकेच्या निकालाबद्दल राज्यात उत्सुकता होती. जिल्हा परिषदेत एकहाती सत्ता मिळविल्यानंतर महापालिकेतही बहुमत मिळाल्याने भाजपचा आनंद द्विगुणित झाला. विशेष म्हणजे 2012 च्या निवडणुकीत भाजपला एकही जागा जिंकता आली नव्हती. महापालिकेच्या 70 जागांसाठी सरासरी 58 टक्के मतदान झाले होते. 401 उमेदवार रिंगणात होते. भाजपने कॉंग्रेसपेक्षा तीन जागा जास्त मिळवून, सत्तेत प्रवेश केला. भाजपला 36 जागांचे घबाड लागले. कॉंग्रेसने 33 जागांवर विजय मिळविला असला, तरी सत्ता थोडक्‍यात गमावली आहे. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसला एका जागेवर समाधान मानावे लागले. शिवसेना आणि रिपाइंला खातेही उघडता आले नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेस, रिपाइंच्या बहुतांश जागा कॉंग्रेसकडे; तर शिवसेनेच्या प्रभागांतील जागा भाजपकडे गेल्याचे दिसून आले. 

विकासालाच साथ 
सत्ताधारी कॉंग्रेस विरुद्ध भाजप अशीच लढत झाली. त्यातही आमदार अमित देशमुख विरुद्ध पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर असा सामना रंगला. शून्यावरील भाजपने थेट सत्तेत एंट्री मिळविली; तर सत्तेतील कॉंग्रेसला तीन सदस्य कमी पडल्याने सत्तेपासून दूर राहावे लागणार आहे. राष्ट्रवादी, शिवसेना व एमआयएमला लोकांनी साफ नाकारल्याने विकासाशिवाय इतर बाबींना लातूरचे मतदार थारा देत नाहीत, असेच म्हणावे लागेल. 

परभणीत कॉंग्रेसला सर्वाधिक जागा 
परभणी ः परभणी महापालिकेत सर्वाधिक 31 जागांवर विजय संपादन करून कॉंग्रेस सर्वांत मोठा पक्ष म्हणून समोर आला. 18 जागा मिळवून राष्ट्रवादी कॉंग्रेस दुसऱ्या क्रमांकावर राहिला. भाजपला आठ जागा मिळाल्या, तर सत्तेचे स्वप्न पाहणाऱ्या शिवसेनेला केवळ सहा जागांवरच समाधान मानावे लागले. दोन जागा अपक्षांच्या पारड्यात गेल्या. 

महापालिकेच्या 65 जागांसाठी गेल्या बुधवारी 65 टक्के मतदान झाले. 418 उमेदवार रिंगणात होते. मतमोजणीला सकाळी दहाला सुरवात झाल्यानंतर अकराला प्रभाग आठचा पहिला निकाल हाती आला. या प्रभागातील सर्व चार जागा जिंकून कॉंग्रेसने विजयाचे खाते उघडले. दुपारी तीनच्या सुमारास सर्व निकाल हाती आले. कॉंग्रेस हा सर्वांत मोठा म्हणून समोर आला असला तरी सत्तेसाठी त्यांना दोघांची गरज भासेल. विजयी झालेले दोन अपक्ष कॉंग्रेसचेच बंडखोर असल्याने ते कॉंग्रेससोबत जातील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. निकाल घोषित होताच कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश वरपुडकर यांनी पत्रकार परिषद घेऊन कॉंग्रेसचाच महापौर होईल, असे घोषित केले. हा विजय नागरिकांनी पक्षावर दाखविलेल्या विश्वासाचा, कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांचा असल्याचेही ते म्हणाले. 

मातब्बर उमेदवार पराभूत 
प्रभाग पंधरामधून राजेंद्र वडकर यांना पराभवाचा सामना करावा लागला. मावळत्या महापौर संगीता वडकर (राष्ट्रवादी कॉंग्रेस) यांचे ते पती आहेत. प्रभाग नऊमधून मावळत्या विरोधी पक्षनेत्या अंबिका डहाळे (शिवसेना) याही पराभूत झाल्या. त्यांना तिसऱ्या क्रमांकावर राहावे लागले. प्रभाग पंधरामध्ये भाजपचे पाचही उमेदवार विजयी झाले. याच प्रभागातून शिवसेनेचे जिल्हा सहसंपर्कप्रमुख डॉ. विवेक नावंदर यांचा पराभव झाला. 

पक्षीय बलाबल 
लातूर 
एकूण जागा - 70 
भाजप - 36 
कॉंग्रेस - 33 
राष्ट्रवादी - 01 
शिवसेना - 00 
रिपाइं - 00 

परभणी 
एकूण जागा - 65 
कॉंग्रेस - 31 
राष्ट्रवादी कॉंग्रेस - 18 
भाजप - 08 
शिवसेना - 06 
अपक्ष - 02 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com