लातूर मंडळाचा निकाल 31.49 टक्के, दहावी पुरवणी परीक्षा ः विभाग राज्यात अव्वल

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 ऑगस्ट 2019

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जुलैत घेण्यात आलेल्या दहावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल शुक्रवारी (ता. 30) जाहीर झाला. लातूर विभागीय मंडळाचा निकाल 31.49 टक्के लागला. नांदेड जिल्हा प्रथम आहे. या निकालात लातूर मंडळ राज्यात आघाडीवर आहे. परीक्षेला बसलेल्या 17 हजार 62 पैकी पाच हजार 336 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. 

लातूर: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जुलैत घेण्यात आलेल्या दहावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल शुक्रवारी (ता. 30) जाहीर झाला. लातूर विभागीय मंडळाचा निकाल 31.49 टक्के लागला. नांदेड जिल्हा प्रथम आहे. या निकालात लातूर मंडळ राज्यात आघाडीवर आहे. परीक्षेला बसलेल्या 17 हजार 62 पैकी पाच हजार 336 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. 

मंडळाचे विभागीय अध्यक्ष संजय यादगिरे यांनी पत्रकारांना ही माहिती दिली. परीक्षेचा राज्याचा निकाल 22.86 टक्के लागला आहे. यात लातूर विभागाचा सर्वाधिक, त्यानंतर नागपूर विभागाचा 30.89 टक्के व अमरावती विभागाचा 29.53 टक्के असा क्रम आहे. नियमित परीक्षेत अनुत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाऊ नये म्हणून ही पुरवणी परीक्षा घेण्यात येते.

मागील तीन वर्षांत राज्याचा निकाल पाहता दरवर्षी निकालाचा टक्का घसरत आहेत. 2017 मध्ये हा निकाल 24.44 टक्के, त्यानंतर 23.66, तर यंदा 22.86 टक्के लागला आहे. राज्यात नऊ विभागीय मंडळ असून, मागील तीन वर्षांच्या निकालात लातूर विभागीय मंडळाचा क्रम मागे होता. यंदा मात्र, राज्याचा निकाल घटला तरी लातूर मंडळाचा निकाल वाढला आहे. दरवर्षी तो वाढत असून 2017 मध्ये 26.10, 2018 मध्ये 29.35, तर यावर्षी 31.49 टक्के लागला आहे. 

लातूर मंडळाअंतर्गत लातूर, उस्मानाबाद व नांदेड हे तीन जिल्हे येतात. निकालात यंदा नांदेड जिल्ह्याने बाजी मारली असून जिल्ह्याचा 33.63 टक्के, उस्मानाबादचा 27.23, तर लातूर जिल्ह्याचा 27.23 टक्के निकाल लागला आहे. या परीक्षेत विभागात एकही विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झालेला नाही. प्रथम श्रेणीत सात, द्वितीय श्रेणीत 29, तर पास श्रेणीत पाच हजार 336 विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याचे श्री. यादगिरे यांनी सांगितले. प्रभारी विभागीय सचिव औदुंबर उकिरडे व सहायक सचिव संजय पंचगल्ले उपस्थित होते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: latur boards result 31.49 percent