लातूरमध्ये चार मजली दुकानाला भीषण आग; अग्निशामक दलाचे जवान वाहनासह घटनास्थळी

burning.
burning.

लातूर: शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या गंजगोलाई ते गुळमार्केट रस्त्यावरील शिवाजीरोडवरील चार मजली पत्र्याच्या शेडला शुक्रवारी (ता. 29) सायंकाळी साडेचार वाजता आग लागली. पत्र्याच्या शेडमध्ये जाण्यासाठी एकच रस्ता असल्याने आणि शेडला खिडक्या व तावदाने नसल्याने ही आग पसरली. अग्निशामक दलाचे जवान वाहनासह घटनास्थळी दाखल झाले.

मात्र, त्यांना आग आटोक्यात आणता आली नाही. आगीने पत्रे व अँगल वितळल्यानंतर आग आटोक्यात यायला सुरवात झाली. रात्री उशिरापर्यंत हे प्रयत्न सुरू होते. दरम्यान रात्री आठ वाजता आग नियंत्रणात आल्याची माहिती उपविभागीय अधिकारी सुनिल यादव यांनी दिली.

शिवाजीरोडवर लोखंडी अँगलवर चार मजली पत्र्याच्या शेडमध्ये कमल इंद्रराज अग्रवाल यांच्या मालकीचे गोयल एंटरप्रायजेस आहे. या शेडमध्ये सायंकाळी साडेचार वाजता आग लागली. आगीचे कारण समजू शकले नाही. मात्र, काही क्षणातच आगीने उग्र रूप धारण केले. आगीचे व धुराचे उंच लोट बाहेर आले. मुख्य बाजारपेठेत व भरवस्तीत ही आग लागल्याने व्यापारी व नागरिकांची धावपळ उडाली. पहिल्या मजल्याला लागलेली आग वाढतच जाऊन शेडच्या खालच्या बाजूला असलेल्या अमृत ट्रेडींग कंपनी व अमोल ट्रेडर्स दुकानात पोहचली.

आगीची माहिती मिळताच पहिल्यांदा शहर पोलिस उपअधीक्षक जितेंद्र जगदाळे हे फौजफाट्यासह तिथे दाखल झाले. त्यानंतर महानगरपालिकेच्या अग्निशामक दलाची वाहने व जवान घटनास्थळी दाखल झाले. पत्र्याचे शेड सर्वबाजूने पूर्ण बंद असल्याने आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक दलाची अडचण झाली. शेडच्या आतील आग आटोक्यात आणणे अशक्य झाले. दलाकडे कुशल मनुष्यबळ व आवश्यक साहित्याचा अभाव ठळकपणे दिसून आला.

आग नियंत्रणात आणण्यासाठी जवानांकडून साहित्य जोडणीसाठी कसरत सुरू होती. यातच आग पसरत असल्याने उदगीर, निलंगा व औसा येथील अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले. आगीने रौद्ररूप धारण केले. यामुळे पत्त्याचा बंगला कोसळावा तसा आगीमध्ये पत्रे व अँगल वितळून खाली कोसळले. त्यानंतर अग्निशामक दलाला आग आटोक्यात आणण्यासाठी संधी मिळाली. तोपर्यंत शेडमधील बिल्डींग मटेरियल, कलर, पाईप, सुतळी, नायलॉन दोऱ्या जळून खाक झाल्या होत्या. सर्व साहित्य जळून राख झाले. शेडच्या बाजूलाच विनोद अग्रवाल यांचे घर असून आगीचे लोट उंचावर जाऊन त्यांच्या तिसऱ्या मजल्याला आग लागली. यात तिसऱ्या मजला जळून खाक झाला. आगीत लाखोचे नुकसान झाले. सुदैवाने आगीत जिवीत हानी झाली नाही.

प्रशासन तळ ठोकून
आग आटोक्यात आणण्याचे तीन तास शर्थीचे प्रयत्न सुरू होते. पोलिसानंतर नगरसेवक सुरेश पवार, महापालिका आयुक्त मित्तल, पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलिस अधीक्षक हिम्मत जाधव, महापौर विक्रांत गोजमगुंडे, उपविभागीय अधिकारी यादव. जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी. एकानंतर एक याप्रमाणे दाखल झाले. सर्व अधिकारी आग आटोक्यात येईपर्यंत घटनास्थळी तळ ठोकून होते. रात्री आठ वाजता आग नियंत्रणात आल्याचे श्री. यादव यांनी सांगितले. आग लागल्यापासून परिसरात बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. गर्दीला आवर घालताना पोलिसांची कसरत झाली. भरवस्तीत चार मजली पत्र्याच्या शेडच्या उभारणीला परवानगी दिलीच कशी, असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित झाला.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com