वॉटरग्रीडमधून लातूरचे अंदाजपत्रक तयार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 सप्टेंबर 2019

पाणीपुरवठामंत्री लोणीकर यांची माहिती; लातूरसाठी एक हजार 713 कोटी निधीचा प्रस्ताव

लातूर : मराठवाड्याला दुष्काळाच्या खाईतून कायमस्वरूपी बाहेर काढण्यासाठी मराठवाडा वॉटरग्रीड ही महत्त्वाकांक्षी योजना सरकारने हाती घेतली आहे. या योजनेत औरंगाबाद व जालना जिल्ह्याच्या चार हजार 293 कोटींच्या कामाला मंजुरी दिली असून लातूर जिल्ह्यासाठी एक हजार 713, तर उस्मानाबाद जिल्ह्यासाठी 1 हजार 409 कोटींचे अंदाजपत्रक तयार करण्यात आल्याची माहिती पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री बबनराव लोणीकर यांनी शुक्रवारी (ता. सहा) येथे दिली. 

शासकीय विश्रामगृहात आयोजित बैठकीत ते बोलत होते. पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. श्री. लोणीकर म्हणाले, ""मराठवाड्याला सातत्याने दुष्काळाने ग्रासले आहे. दरवर्षी कोणत्या ना कोणत्या जिल्ह्याला दुष्काळाच्या झळा बसत आहेत. व

र्षानुवर्षे लागलेला हा दुष्काळाचा कलंक पुसून काढण्यासाठी वॉटरग्रीड योजनेचा पुरस्कार झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही योजनेला मंजुरी दिली. लातूर जिल्ह्याचा योजनेत समावेश करण्यासाठी पालकमंत्री निलंगेकर यांनी मोठा पाठपुरावा केल्यानेच जिल्ह्यासाठी स्वतंत्र अंदाजपत्रक तयार कण्यात आले आहे. लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांनी पाठपुरावा केल्याने जिल्ह्यात पाणीपुरवठा योजना; तसेच पाणीटंचाई निवारणासाठी मागील पाच वर्षांत 644 कोटी 52 लाखांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.'' राष्ट्रीय ग्रामीण पेयजल व मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमातून जिल्ह्यात मंजूर केलेल्या योजनांची माहिती श्री. लोणीकर यांनी दिली.

यावेळी मुख्यमंत्र्यांचे स्वीय सहायक अभिमन्यू पवार, आमदार विनायकराव पाटील, आमदार सुधाकर भालेराव यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Latur budget estimates from WaterGrid