चाकूर नगरपंचायत निवडणुकीसाठी नव्याने आरक्षण, इच्छुकांची निराशा | Chakur Municipal Council In Latur | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Chakur Municipal Council In Latur
चाकूर नगरपंचायत निवडणुकीसाठी नव्याने आरक्षण, इच्छुकांची निराशा

चाकूर नगरपंचायत निवडणुकीसाठी नव्याने आरक्षण, इच्छुकांची निराशा

चाकूर (जि.लातूर) : नागरिकांच्या मागासप्रवर्गाचे आरक्षण २७ टक्क्यांपेक्षा जास्त झाल्यामुळे एक वर्षापूर्वी काढण्यात आलेले नगरपंचायतीच्या (Chakur Municipal Council) प्रभागाचे आरक्षण रद्द करून सोमवारी (ता.१५) नव्याने आरक्षण सोडत काढण्यात आली. यात काही अंशी बदल झाल्यामुळे वर्षापासून प्रभागात काम करीत असलेल्या इच्छुकांची निराशा झाली आहे. नगरपंचायतीच्या सभागृहात उपविभागीय अधिकारी प्रविण फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली आरक्षण सोडत काढण्यात आली. यावेळी तहसीलदार डाॅ. शिवानंद बिडवे, अहमदपुरचे मुख्याधिकारी त्र्यंबक कांबळे यांची उपस्थिती होती. नगरपंचायतीची मुदत २६ नोव्हेंबर २०२० रोजी संपली असून यासाठी ११ नोव्हेंबर २०२० रोजी आरक्षण काढण्यात आले होते. परंतू कोरोनामुळे निवडणूक पुढे लोटण्यात आल्या आहेत. १७ जागांपैकी ५ जागा नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी आरक्षित झाल्या होत्या. आरक्षण काढताना झालेल्या चुकीमुळे यात नागरिकांच्या मागासप्रवर्गाचे आरक्षण २७ टक्क्याच्या पुढे गेले होते. (Latur)

हेही वाचा: हजारो पणत्या पेटवून संत नामदेव महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा साजरा

यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या सुचनेनुसार यात बदल करण्याचा आदेश राज्य निवडणुक आयोगाकडून काढण्यात आला आहे. नव्याने काढण्यात आलेल्या आरक्षणानुसार प्रभाग एक, तीन, सात, नऊ, अकरा हे प्रभाग सर्वसाधारण महिला, दोन, चार, बारा, सोळा, सतरा हे सर्वसाधारण, प्रभाग पाच, तेरा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला, आठ, चौदा नागरिकांचा मागास प्रवर्ग, सहा व दहा अनुसुचित जाती महिला, पंधरा अनुसुचित जातीसाठी आरक्षित झाले आहे. एक वर्षापूर्वी काढलेल्या आरक्षणानुसार कोणत्याही क्षणी निवडणुक होतील. या अपेक्षेने इच्छुकांनी प्रभागात मोर्चे बांधणी केली होती. परंतु आरक्षणात बदल झाल्यामुळे निराशा झाली आहे. यावेळी कक्षाधिकारी भरतसिंह ठाकूर, गणी शेख, निझामोद्दीन शेख, प्रशांत झांबरे, सुधाकर कांबळे, एम. जी. मस्के, प्रसन्ना कुलकर्णी, बालाजी स्वामी, बळीराम शिंदे, माधव कांबळे यांच्यासह विविध पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.

loading image
go to top