लातूर शहरातील स्वच्छतागृहे कुलूपबंद

Toilet
Toilet

लातूर - शहरात १७ ठिकाणी स्वच्छतागृहे उभारण्याचा मनोदय प्रशासनाने व्यक्त केला असला तरी काही स्वच्छतागृहे अजूनही ‘कुलूपबंद’ आहेत. तर काही स्वच्छतागृहांचे बांधकाम महिनोनमहिने रेंगाळलेल्या स्थितीत आहे. त्यामुळे ‘आम्ही जायचं कुठं’ हा सर्वसामान्यांचा प्रश्न कायम आहे. त्याकडे महापालिका आणि बांधकाम विभागाचे दुर्लक्ष असल्याचेच दिसून येत आहे.

शहराच्या प्रमुख भागात स्वच्छतागृहांची कमतरता होती. त्यामुळे दुर्गंधीचे वातावरण पसरले होते. हे चित्र बदलावे आणि लातूर स्वच्छ-सुंदर बनावे म्हणून शहराच्या वेगवेगळ्या भागांत स्वच्छतागृहे उभारण्याचा निर्णय वर्षभरापूर्वी घेण्यात आला. त्यानंतर २६ जानेवारी रोजी शहरातील काही स्वच्छतागृहांचे लोकार्पण पालकमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांच्या हस्ते करण्यात आले. या दिवशी १२ स्वच्छतागृहे सुरू करण्यात आली. तर, उर्वरित स्वच्छतागृहे महिनाभरात सुरू होतील, असे जाहीर करण्यात आले. मात्र, पाच महिन्यांनंतरही काही स्वच्छतागृहांचे बांधकाम अर्धवट असल्याचे, तर काही स्वच्छतागृहे कुलूपबंद स्थितीत असल्याचे ‘सकाळ’च्या पाहणीत आढळून आले आहे.

गंजगोलाई, शिवाजी चौक, पीव्हीआर चौक, दयानंद गेट, प्रकाशनगर (पाण्याची टाकी), खर्डेकर स्टॉप येथील स्वच्छतागृहे चालू स्थितीत आहेत. मात्र, शिवाजी चौकातील उड्डाणपुलाखाली असलेली दोन स्वच्छतागृहे अद्याप कुलूपबंद आहेत. अशीच स्थिती लोकमान्य टिळक चौकातील (अशोक हॉटेल) यशवंतराव चव्हाण कॉम्प्लेक्‍समधील स्वच्छतागृहांची आहे. येथेही स्त्री आणि पुरुषांसाठी दोन स्वच्छतागृहे बांधून पूर्ण झाली आहेत. पण, त्याचा वापर होताना दिसत नाही. येथील स्वच्छतागृहे कायम बंदच असतात, असा अनुभवही येथील नागरिकांनी ‘सकाळ’ला सांगितला.

अंबाजोगाई रस्त्यावर जुना रेणापूर नाका परिसरात स्वच्छतागृह उभारण्याचे काम महिनोन्‌महिने सुरू आहे. अतिशय संथ गतीने हे काम होत आहे. पण, प्रशासनाची त्याकडे डोळेझाक होत आहे. 

दरम्यान, स्वच्छतागृह उभारण्याचे काम बांधकाम विभागाचे आहे. आमच्याकडे स्वच्छतेची जबाबदारी आहे, असे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com