क्लासचालक खून प्रकरण ; 'त्या' ताकदवान व्यक्तीचा शोध घ्या

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 30 जून 2018

अविनाश चव्हाण यांचा रविवारी मध्यरात्री खून झाला. क्लास संचालकाच्या या खुनामुळे लातूरकरांना धक्काच बसला. शहरातील सर्व क्लास दोन दिवस बंदही ठेवण्यात आले होते. या प्रकरणात पोलिसांनी तत्परतेने तपास लावून 5 आरोपीना अटक केली.

लातूर : 'स्टेप बाय स्टेप' क्लासचे संचालक अविनाश चव्हाण यांच्या खूनप्रकरणात अटक करण्यात आलेल्या प्रा.चंदनकुमार शर्माच्या पाठीमागे ताकद कोणी उभी केली होती? त्या ताकदवान व्यक्तीचा पोलिसांनी शोध घ्यावा", अशी मागणी चव्हाण यांचे वडील बाबूराब चव्हाण आणि श्याम जाधव यांनी शनिवारी केली.

अविनाश चव्हाण यांचा रविवारी मध्यरात्री खून झाला. क्लास संचालकाच्या या खुनामुळे लातूरकरांना धक्काच बसला. शहरातील सर्व क्लास दोन दिवस बंदही ठेवण्यात आले होते. या प्रकरणात पोलिसांनी तत्परतेने तपास लावून 5 आरोपीना अटक केली. या पार्श्वभूमीवर मी वडार महाराष्ट्राचा या संघटनेतर्फे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यात चव्हाण यांचे वडील बाबूराब चव्हाण यांचे वडील यांनी खुनामागील ताकदवान व्यक्तीचा शोध घेण्याची मागणी केली.

बाबुराव चव्हाण म्हणाले, "अविनाश हा गोर गरीब विद्यार्थ्यांसाठी काम करत होता. इतरांपेक्षा कमी शुल्क घ्यायचा. त्यामुळे या प्रकरणात अटक केलेल्या 5 आरोपींशिवाय व्यावसायिक स्पर्धेतून दुखावलेले आणखी काही व्यक्ती असू शकतात. चंदनकुमार हा परराज्यातील आहे. तो एवढे मोठे षड्यंत्र रचू शकत नाही. तो केवळ मोहरा आहे. त्याच्यामागे उभा असलेला ताकदवान व्यक्ती दुसराच असू शकतो. पोलिसांनी त्याचा शोध घ्यावा.

या खून प्रकरणामध्ये विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करा, खटला जलदगती न्यायालयात चालवा, गुन्हेगारांना फाशीची शिक्षा द्या, अशा मागण्याही बाबूराव चव्हाण यांनी केल्या. यावेळी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष शाम जाधव, नरसिंग बनगर, शिवाजी चव्हाण, त्र्यंबक जाधव, अनिल मुडाळे उपस्थित होते.

Web Title: Latur Class murder case Find that strongest person demanded by chavan parents