esakal | अकरा कोविड सेंटर बंद, लातूर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश 
sakal

बोलून बातमी शोधा

covid center start.jpg
  1. कोरोना रुग्ण नसलेल्या अकरा कोविड सेंटर बंद करण्याचे आदेश  जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे.
  2. सेंटरवरील कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सेवा संपुष्टात.

अकरा कोविड सेंटर बंद, लातूर जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश 

sakal_logo
By
विकास गाढवे

लातूर : जिल्ह्यात काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत असून, सध्या रुग्णसंख्या नऊशेपर्यंत खाली आहे. यामुळे कोरोना रुग्णांसाठी जिल्ह्यात विविध ठिकाणचे काही कोविड केअर सेंटर रिकामेच झाले. असे अकरा सेंटर जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी सोमवारी (ता. २६) तात्पुरत्या स्वरूपात बंद केले असून, या सेंटरमध्ये नियुक्ती कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सेवाही संपुष्टात आणल्या आहेत. पुढे चालून हे सेंटर सुरू करण्याची गरज भासल्यास सेंटरवरील कर्मचाऱ्यांना पुन्हा नियुक्त्या दिल्या जाणार असल्याचे श्रीकांत यांनी स्पष्ट केले आहे. 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!


शहरातील बिडवे इंजिनिअरिंग कॉलेज, दयानंद कॉलेज होस्टेल लातूर, बार्शी रोडवरील शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतन, पुरणमल लाहोटी तंत्रनिकेतनच्या मुलामुलींचे वसतिगृह तर उदगीर येथील जयहिंद पब्लिक स्कूल, जळकोट येथील संभाजी केंद्रे अध्यापक महाविद्यालय, देवणी, लामजना (ता. औसा) व जाऊ (ता. निलंगा) येथील समाजकल्याण वसतिगृह, बावची (ता. रेणापूर) व मरशिवणी (ता. अहमदपूर) येथील मुलींची शासकीय निवासी शाळेतील सेंटर बंद करण्यात आली आहे. जिल्ह्यात सध्या ९०९ कोरोना रुग्ण असून, त्यातील ४८२ रुग्ण विविध रुग्णालयात तर ४२७ रूग्ण हे गृहविलगीकरणात आहेत. काही दिवसांपासून एकही रुग्ण नसलेल्या कोविड केअर सेंटरची माहिती नोडल अधिकाऱ्यांनी सोमवारी निदर्शनास आणून दिल्यानंतर श्रीकांत यांनी ते तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्याचा निर्णय दिला. यासोबत सेंटरमधील सर्व कंत्राटी अधिकारी व कर्मचाऱ्यांची सेवाही सोमवारपासून संपुष्टात आणल्या असून, हे सेंटर भविष्यात सुरू झाल्यास या सर्वांना तिथे संधी देण्यात येणार असल्याचे श्रीकांत यांनी सांगितले. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

कोरोना संपलेला नाही 
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी कोरोनाचे समूळ उच्चाटन झालेले नाही. यामुळे नागरिकांनी पूर्वीप्रमाणेच दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी केले आहे. शासन व प्रशासनाने कोरोना प्रतिबंधासाठी दिलेल्या तोंडाला मास्क लावणे, हात स्वच्छ धुणे व सुरक्षित अंतर पाळणे आदी मार्गदर्शक सूचनांचे नियमित तंतोतंत पालन करावे. यामुळे येत्या काळात लातूर जिल्हा कोरोनामुक्त होण्यास मदत होणार असल्याचे श्रीकांत यांनी सांगितले. 

(संपादन-प्रताप अवचार)