बाप रे! सायकलला दिवा लावून का फिरतात कलेक्टर रात्री?

विकास गाढवे
शनिवार, 28 डिसेंबर 2019

  • लोकही भेटतात अन् रस्त्यावरले खड्डे दिसतात
  • जिल्हाधिकारी श्रीकांत यांचा फिटनेस फंडा
  • लातुरात रात्रीच्या वेळी सायकल फेरी

लातूर : प्रशासन व लोकांतील दुरावा कमी करून त्यांच्या समस्या जवळून जाणून घेण्यासोबत बारा ते चौदा किलोमीटर सायकलींगचा नवा फिटनेस फंडा जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी चार दिवसापासून सुरू केला आहे.

ते शहरात रात्रीच्या वेळी विविध भागांना सायकलवरून भेटी देत लोकांशी संवाद साधत आहेत. लोकही भेटतात आणि रस्त्यावरले खड्डेही दिसतात, असे सांगत श्रीकांत यांनी फिटनेस फंड्याचे गुपित सांगितले.

Image result for g shrikant

लोकांत मिसळून त्यांचे प्रश्न जाणून घेऊन तातडीने मार्गी लावण्यामुळे जिल्हाधिकारी श्रीकांत यांच्या कामाची नेहमी चर्चा होते. प्रशासन व लोकांतील दुरावा कमी करण्याचा ते सातत्याने प्रयत्न करतात. यातूनच त्यांनी येथे रूजू होताच स्वतःचा मोबाईल क्रमांक जाहिर करून त्यावर संपर्क साधण्याचे आवाहन केले. 

काही दिवसापू्र्वी त्यांनी महसूल मंडळाच्या ठिकाणी जाऊन मंडळातील गावांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या. किसान सन्मान योजनेसह विविध योजनांचा लाभ पात्र लाभार्थींना देण्यासाठी त्यांची धडपड सुरू असते. रोजचे सरकारी कामकाज करत ते फिटनेसलाही प्राधान्य देतात. मैदानावर जाऊन क्रिकेट, फुटबॉल व अन्य खेळ खेळण्यासोबत पोहण्याचाही छंदही ते जोपासतात.

शहराच्या विविध भागाला भेटी

काही महिन्यांपासून त्यांनी सायकलींग सुरू केली आहे. नवरात्र महोत्सवात त्यांनी लातूर ते तुळजापूर दरम्यान सायकल वारी केली होती. चार दिवसापासून त्यांनी शहरात सायकलींग सुरू केली आहे. रात्रीच्या वेळी ते शहराच्या विविध भागाला भेटी देत आहेत. त्यांच्यासोबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपिन ईटनकर व अन्य अधिकारीही सहभागी होत आहेत.

हेही वाचा - बीडचा सह्याद्री देवराई प्रकल्प महाराष्ट्रात पथदर्शी ठरेल - सयाजी शिंदे

या फेरीत ते लोकांच्या भेटी घेऊन त्यांच्याशी संवाद साधत आहेत. त्यांचे प्रश्न जाणून घेऊन ते सोडवण्यावरही त्यांचा भर आहे. कारमधून फिरताना लोकांचे प्रश्न समजून येत नाहीत. मात्र, सायकलवरून फिरताना या प्रश्नांची माहिती होत आहे. निवेदन व अन्य मार्गाने दररोज समोर येणाऱ्या प्रश्नांपेक्षा सायकल फेरीतून येणारे प्रश्न वेगळे असल्याचा प्रत्यय श्रीकांत यांना आला आहे.

शहराच्या विविध मार्गावरून ते दररोज बारा ते चौदा किलोमीटर सायकलरून रपेट मारतात. यामुळे प्रशासन सतर्क रहात असल्याचे चित्र आहे.

जावयांनी सायकलवरून पाहिले सासर

जलसंपदा विभागातील एका अभियंत्यांचे जावई व भारतीय परराष्ट्र सेवेतील अधिकारी माधव सुलफुले हे गुरूवारी (ता. 27) रात्री जिल्हाधिकारी श्रीकांत यांना भेटण्यासाठी आले होते. त्यांना सोबत घेऊन श्रीकांत यांनी सायकलवरून शहरात फेरी मारली.

हेही वाचा - कॅब, एनआरसीसंदर्भातील आंदोलनाला यापुढे परवानगी नाही

यानिमित्ताने लातूरचे जावई असलेल्या सुलफुले यांना सायकलवरून पहिल्यांदाच स्वतःचे सासर जवळून पहाता आले. यापुढेही विविध भागाला सायकवरून भेटी देऊन लोकांशी संवाद साधणार असल्याचे श्रीकांत यांनी सांगितले.

हेही वाचा - समृद्धी महामार्गाच्या कामाचा असाही साईड इफेक्ट, वाचा-


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Latur District Collector G. Shrikant Fitness Funda Motivational News