लातूर जिल्हाधिकाऱ्यांनी वृक्षलागवड करुन केले मुलीच्या जन्माचे स्वागत

विकास गाढवे
Wednesday, 2 December 2020

श्रीकांत यांना कन्यारत्न; ड्रममध्ये केली तीस मोठ्या वृक्षाची लागवड 

लातूर : जिल्हाधिकारी जी. श्रीकांत हे स्वतःच्या कौटुंबिक कार्यक्रमातून नेहमीच सरकारच्या 'बेटी बचाओ - बेटी पढाओ' अभियानाला चालना देण्याचा प्रयत्न करतात. सोमवारी (ता. 30) त्यांना कन्यारत्न झाल्यानंतर मंगळवारी (ता. एक) त्यांनी शहरात तीस मोठ्या वृक्षाची लागवड करून मुलीच्या जन्माचे स्वागत केले. राजीव गांधी चौक ते महात्मा बसवेश्वर चौका दरम्यान मोठ्या ड्रममध्ये या वृक्षांची लागवड साकारून समाजाला मुलीचा सन्मान करण्याचा अनोखा संदेश दिला. 

 

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

जी. श्रीकांत व सोनम श्रीकांत दाम्पत्याला शाश्वती ही पहिली मुलगीच आहे. सोमवारी सकाळी दुसऱ्या मुलीचे त्यांच्या परिवारात आगमन झाले. शाश्वतीच्या जन्मापासून श्रीकांत यांनी तिचा आगळ्यावेगळ्या पद्धतीने सन्मान वाढवला आहे. शाश्वतीचा प्रत्येक वाढदिवस ते एक कल्पना (थीम) निश्चित करून साजरा करतात. यामुळेच वाढदिवसाच्या कार्यक्रमाचे वेगळेपण सर्वांनाच भावते व ते अनेक दिवस चर्चेत रहाते. या कार्यक्रमात ते सहकारी अधिकारी, कर्मचारी व सर्वांना सहभागी करून घेऊन तुम्हीही मुलीचा मुलापेक्षा जास्त सन्मान करा, असा संदेश देतात. कोरोना प्रतिबंधासाठी त्यांनी सुरू केलेल्या अँटी कोरोना पोलिस उपक्रमात त्यांनी स्वतःच्या घरी शाश्वतीचीच पहिली अँटी कोरोना पोलिस म्हणून नियुक्ती केली होती. हा उपक्रम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही खूप भावला होता. त्यांनी त्याचे कौतुक केले. याशिवाय उपक्रमाचे मान्यवरांसह अनेकांनी अनुकरण केले. सोमवारी त्यांना दुसरी मुलगी झाल्यानंतर आनंदोत्सव साजरा करत शाश्वतीसारखाच तिलाही सन्मान देण्यास सुरवात केली. यातूनच त्यांनी तिच्या जन्माचे स्वागत म्हणून मंगळवारी ग्रीन लातूर वृक्ष टीमच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेत वृक्षलागवड केली. 30 तारखेला तिचा जन्म झाल्यामुळे तीस वृक्षाची लागवड केल्याचे श्रीकांत यांनी सांगितले. 

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

श्रीकांत परिवाराची 63 वृक्ष 

नागपूर ते रत्नागिरी हा राष्ट्रीय महामार्ग राजीव गांधी चौक ते महात्मा बसवेश्वर चौकातून जाणार आहे. रस्त्याच्या कामात दुभाजकात लावलेल्या वृक्षाची तोड होण्याची शक्यता गृहीत धरून ग्रीन लातूर वृक्ष टीमने मोठ्या ड्रममध्ये वृक्षलागवडची संकल्पना पुढे आणली आहे. पुढे काम झाले तरी ड्रममधील वृक्ष जीवंत राहणार आहेत. दोन्ही चौका दरम्यान 260 वृक्षलागवडीचे नियोजन असून आतापर्यंत 183 वृक्षांसाठी दानशूरांनी योगदान दिले असून त्यात एकट्या श्रीकांत परिवाराची 63 वृक्ष आहेत. मागील महिन्यात सोनम श्रीकांत यांनी त्यांच्या 33 व्या वाढदिवसानिमित्त 33 वृक्षांची लागवड केली होती.

(संपादन-प्रताप अवचार)
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Latur District Collector G Srikanth welcome birth girl child by planting trees