लातूर जिल्हा परिषदेत इतिहास घडेल - मुख्यमंत्री

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 13 फेब्रुवारी 2017

लातूर - लातूर जिल्हा परिषदेवर गेली 35 वर्षे कॉंग्रेसची सत्ता होती. कसा भ्रष्ट कारभार झाला आहे, हे तुम्हाला माहीत आहे. त्यामुळे आता पाच वर्षे आमच्या हातात सत्ता द्या, जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करू. या सभेची उपस्थिती पाहून जिल्हा परिषदेत इतिहास घडेल. भाजपचा झेंडा जिल्हा परिषदेवर फडकेलच, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. 

लातूर - लातूर जिल्हा परिषदेवर गेली 35 वर्षे कॉंग्रेसची सत्ता होती. कसा भ्रष्ट कारभार झाला आहे, हे तुम्हाला माहीत आहे. त्यामुळे आता पाच वर्षे आमच्या हातात सत्ता द्या, जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करू. या सभेची उपस्थिती पाहून जिल्हा परिषदेत इतिहास घडेल. भाजपचा झेंडा जिल्हा परिषदेवर फडकेलच, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. 

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताते भाजपच्या वतीने रविवारी (ता. 12) आयोजित परिवर्तन सभेत ते बोलत होते. पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, खासदार डॉ. सुनील गायकवाड, माजी खासदार डॉ. गोपाळराव पाटील, माजी खासदार रूपाताई पाटील निलंगेकर, आमदार सुधाकर भालेराव, विनायक पाटील, रमेश कराड, शैलेश लाहोटी, गणेश हाके, विजय क्षीरसागर, गुरुनाथ मगे, सुधीर धुतेकर आदी उपस्थित होते. 

राज्यात 50 वर्षांच्या कॉंग्रेसच्या राजवटीत केवळ त्यांचाच विकास झाला. सामान्य माणसाच्या जीवनात मात्र परिवर्तन आले नाही. कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पंधरा वर्षांत जेवढे दिले नाही त्यापेक्षा जास्त आम्ही दोन वर्षांत शेतकऱ्यांना दिले. मराठवाड्यात जलयुक्त शिवार योजना राबवली जात आहे. आघाडीने 70 हजार कोटी रुपये खर्च करून एक टक्का सिंचन केले नाही पण आम्ही केवळ तीन हजार कोटी व लोकांच्या पाचशे कोटीमध्ये 12 लाख हेक्‍टर क्षेत्र सिंचनाखाली आणले. मागेल त्याला शेततळ्याची योजना सुरू केली. लातूरचा दुष्काळ पाहूनच ही योजना मला सुचली, असे श्री. फडणवीस म्हणाले. 

नानाजी देशमुख कृषी समृद्धी प्रकल्पातून शेतकऱ्यांसाठी जागतिक बॅंकेकडून पहिल्यांदाच पाच हजार कोटींचे कर्ज उपलब्ध करून घेण्यात आले. मराठवाड्यातील तीन हजार गावांचा यातून कायापालट केला जाणार आहे. देशातील हा पथदर्शी प्रकल्प आहे. त्यात लातूर जिल्ह्याचा समावेश आहे. प्रत्येक मंडळात स्वयंचलित हवामान केंद्र सुरू करण्यात येणार आहे. ग्रामपंचायती डिजिटल केल्या जात आहेत, असे श्री. फडणवीस म्हणाले. सूत्रसंचालन ऍड. शैलेश गोजमगुंडे यांनी केले. या सभेला कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

विलासरावांच्या पुतळ्यातही भ्रष्टाचार! 
लातूर जिल्हा परिषदेत (कै.) विलासराव देशमुख यांचा पुतळा उभारण्यात आला आहे. यातदेखील भ्रष्टाचार झाल्याची माहिती मला मिळाली. मी त्याची चौकशी केलेली नाही. पण असे झाले असेल तर ते अत्यंत वाईट आहे. झाले नसेल तर उत्तमच! पण कॉंग्रेसची हीच मानसिकता आहे, अशी टीका श्री. फडणवीस यांनी यावेळी केली.

Web Title: Latur district conference will be history - CM