esakal | डॉ. लक्ष्मण देशमुख लातूरचे नवे `सिव्हील सर्जन`; डॉ. ढगे यांची बदली.
sakal

बोलून बातमी शोधा

latur civil.jpg
  • जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. ढगे यांची बदली.  
  • मुरूडचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. देशमुख यांची जिल्हा शल्यचिकीत्सकपदी नियुक्ती. 

डॉ. लक्ष्मण देशमुख लातूरचे नवे `सिव्हील सर्जन`; डॉ. ढगे यांची बदली.

sakal_logo
By
विकास गाढवे

लातूर : येथील जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय ढगे यांची बदली झाली असून त्यांच्या जागी मुरूडच्या (ता. लातूर) ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. लक्ष्मण देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे. डॉ. ढगे यांची बदली झाली तरी त्यांच्या नियुक्तीचे आदेश सरकारने अद्याप दिले नाहीत.

मराठवाड्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी यावर क्लिक करा..!

नवीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. देशमुख यांचे मुळ गाव वरबगाव (ता. केज, जि. बीड) असून त्यांनी अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस तर मुंबईच्या जेजे महाविद्यालयातून एमडीची (मेडीसीन) पदवी मिळवली. सुरवातीला सहा वर्ष बीड जिल्हा परिषदेत काम केल्यानंतर पाच वर्ष त्यांनी मुंबईत सेवा केली. त्यानंतर येथील जिल्हा रूग्णालयात २००१ ते २०११ अशी दहा वर्ष सलग सेवा केली. २०११ ते २०१५ चाकूर तर २०१५ ते २०१९ बाभळगाव रूग्णालयात ते कार्यरत होते. गेल्यावर्षी मुरूडच्या ग्रामीण रूग्णालयात रूजू झाले. कोरोनाच्या काळात त्यांनी चांगले योगदान दिले आहे. मुरूडमधील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रभावी प्रयत्न करताना त्यांनी जिल्ह्यातील सर्वात मोठ्या एक हजार मुलांच्या शाळेतील कोवीड केअर सेंटरचे नोडल अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडली. या सेंटरमध्ये आतापर्यंत साडेचार हजार रूग्णांवर उपचार झाले. सेंटरमधील सेवांचा दर्जा चांगला ठेवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. एमआयटीच्या कोवीड केअर सेंटरच्या ट्रेनिंग सेटअपचीही जबाबदारी त्यांनी पार पाडली आहे.

औरंगाबाद जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

कमी वयात पद अन् सोनेरी कारकीर्द
पाटोदा (बु. ता. जळकोट) येथील मुळचे रहिवाशी असलेल्या डॉ. ढगे यांनी औरंगाबादच्या घाटीतून एमबीबीएस तर मुंबईच्या बीजेतून एमडी पदवी मिळवली. उदगीरला चार वर्ष फिजिशियन व जळकोटला दीड वर्ष वैद्यकीय अधीक्षक म्हणून काम केल्यानंतर त्यांनी मुंबईत राजभवनला राज्यपालांचे भिषक म्हणून तीन वर्ष जबाबदारी पार पाडली. तेथून २८ मार्च २०१८ रोजी येथे बदली झाली. सर्वात कमी वय असलेले जिल्हा शल्यचिकित्सक म्हणून त्यांची आरोग्य विभागात ओळख आहे. येथे आलेल्या लाईफ लाईन एक्सप्रेसचा हजारो रूग्णांना त्यांनी लाभ मिळवून दिला.

देशभरातील महत्त्वाच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

दोन आठवड्यात ५११ नेत्र शस्त्रक्रिया करून आघाडी घेतली. त्यांच्यामुळे मोतीबिंदू शस्त्रक्रियेत २०१८ मध्ये जिल्हा राज्यात प्रथम तर गेल्यावर्षी दुसरा राहिला. रूग्णालयात त्यांनी टेलिमेडीशीन व बायोमेट्रीक प्रणाली सुरू केली. लक्ष्य कार्यक्रमात स्त्री रूग्णालय, निलंगा व उदगीर संस्थांना मानांकन मिळाले. सर्व संस्थांना प्रत्येकी चार लाखाचे पारितोषिक मिळाले. रखडलेल्या जिल्हा रूग्णालयासाठी जागा ताब्यात घेतली. कोरोना काळात सर्व वैद्यकीय यंत्रणेत समन्वय ठेवण्यासाठी प्रभावी भूमिका पार पाडून जिल्ह्याचा लौकीक त्यांनी कायम ठेवला. कमी वयातील पदावर त्यांची कारकीर्द सोनेरी ठरली.

कोरोनाने सरकारी आरोग्य यंत्रणेचे महत्व सर्वांच्या लक्षात आणून दिले. आपत्कालीन परिस्थितीत सरकारी यंत्रणाच सामान्य माणसाच्या उपयोगाला येऊ शकते, याची जाणीवही सर्वांना झाल्यामुळे जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचे मजबुतीकरण करण्याला पहिले प्राधान्य असणार आहे. जिल्हा रूग्णालय सुरू करणे. स्त्री रूग्णालयाचा विस्तार करण्यासह चाकूर, मुरूड व अहमदपूर येथील अर्धवट ट्रॉमा केअर सेंटरचे काम पूर्ण करणे. उदगीरच्या ट्रॉमा केअरचे काम तडीस नेऊन शिरूर अनंतपाळ व औराद शहाजानी ग्रामीण रूग्णालये सुरू करणे. संभाव्य ग्रामीण रूग्णालयाच्या उभारणीसह काही ग्रामीण रूग्णालयाये उपजिल्हा रूग्णालयात रूपांत्तर करण्याचाही प्रयत्न करणार आहे. डॉक्टर व कर्मचाऱ्यांच्या सतत प्रशिक्षणातून त्यांचे आत्मबळ वाढवण्याचे नियोजन आहे.
- डॉ. लक्ष्मण देशमुख, जिल्हा शल्यचिकित्सक, लातूर.

(संपादन-प्रताप अवचार)