रस्त्यावरील खड्डे नीट तरी बुजवा

pathholes
pathholes

लातूर ः गेल्या काही महिन्यांपासून शहरातील रस्ते हे खड्ड्यांचे रस्ते बनले आहेत. महापालिकेने काही दिवसांपूर्वी मुरूम टाकून हे खड्डे बुजविण्याचा प्रयत्न केला. तो फसला. आता याच खड्ड्यांचे डांबरी पॅचवर्क करण्यात येत आहे. खड्ड्यांच्या ठिकाणी व्यवस्थित खोदकाम करून तेथे डांबरी पॅचवर्क केला तर तो जास्त काळ टिकतो; पण येथे तसे न करता खड्ड्यांतील मुरुमावरच डांबराचा पॅचवर्क देऊन काम उरकण्याचा प्रयत्न महापालिकेकडून केला जात आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज आहे. 

रस्ते गेले खड्ड्यांत 
शहरातील अंतर्गत रस्ते हे सिमेंटचे आहेत. त्यामुळे त्या रस्त्याची अवस्था चांगली आहे; पण शहरातील मुख्य रस्ते हॉटमिक्‍सचे आहेत. गेल्या काही महिन्यांपासून या रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. "रस्त्यांत खड्डा की खड्ड्यांत रस्ते' अशी अवस्था या रस्त्यांची आहे. त्यात औसा रस्ता सोडला तर बार्शी रस्ता, अंबाजोगाई रस्ता, नांदेड रस्ता या तीनही रस्त्यांची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. पावसामुळे शहरातील रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. यामुळे नागरिकांना वाहतुकीदरम्यान अडचणी येत आहेत. 

पालकमंत्र्यांचे आदेशही धाब्यावर 
मुरूम टाकून हे खड्डे बुजविले जात आहेत. मुरूम टाकून खड्डे बुजविले तरी काही दिवसांत परिस्थिती जैसे थे होईल. खड्ड्यांतील मुरूम निघून जाऊन पुन्हा खड्डे तयार होतील. त्यामुळे मुरुमाऐवजी कोल्डमिक्‍स टाकून हे खड्डे बुजवावेत, अशा सूचना पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी काही दिवसांपूर्वी दिले होते; पण महापालिकेने त्यांचे आदेश धाब्यावर बसवून पॅचवर्कचे काम सुरू केले आहे. 

दुरुस्तीवर लाखोंचा खर्च 
काही दिवसांपूर्वी रस्त्यांवरील हे खड्डे मुरूम टाकून बुजविण्यात आले; पण आठ-दहा दिवसांत त्यांची अवस्था पहिल्या सारखीच झाली. या खड्ड्यांचा मोठा त्रास लातूरकरांना सहन करावा लागत आहे. आता दोन दिवसांपासून महापालिकेच्या वतीने या रस्त्यावरील खड्ड्यांचे डांबरी पॅचवर्क केले जात आहे. या सर्व कामावर लाखोंचा खर्च केला जात आहे. 

झोनच्या अभियंत्यांचे दुर्लक्ष 
रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याची जबाबदारी झोनच्या अभियंत्यावर आहे. रस्त्यांवरील हे खड्डे व्यवस्थित दुरुस्त केले जात आहेत का, हे पाहण्याचे काम झोनच्या अभियंत्यांचे आहे. सध्या निकृष्ट दर्ज्याचे पॅचवर्क केले जात आहे. ज्या ठिकाणी रस्त्यावर खड्डा आहे तो खड्डा व्यवस्थित खोदून त्यात खडी टाकून नंतर कच व डांबराचा वापर करून तो दुरुस्त करणे आवश्‍यक आहे; पण सध्या कंत्राटदारांकडून ओबडधोबड करण्याचा प्रकार सुरू आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी काम होत आहे त्या ठिकाणी रस्त्यावर खडीच खडी पसरल्याचे चित्र दिसत आहे. या खडीचाही वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे. या सर्व प्रकाराकडे झोनच्या अभियंत्यांचे दुर्लक्ष होत आहे. याकडे वरिष्ठांनीच लक्ष देण्याची गरज आहे.  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com