
Girish Mahajan : पालकमंत्री महाजनांचे ‘फास्टट्रॅक’ काम
लातूर : जिल्ह्याचे नूतन पालकमंत्री गिरीष महाजन यांनी कामे कशा पद्धतीने ‘फास्टट्रॅक’वर केली जातात याची चूणुक जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत दाखवून दिली. गेली काही वर्ष प्रलंबित असलेले प्रश्न त्यांनी तातडीने संबंधीत विभागाच्या मुंबईतील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी मोबाईलवर संपर्क साधत मार्गी लावली. हे करीत असताना लातूर जिल्ह्याला निधी कमी पडू दिला जाणार नाही, दर्जेदार कामे करा कारवाई करण्याची वेळ आणू नका असा सज्जड दमही त्यांनी अधिकाऱ्यांना भरला.
महाजन पालकमंत्री झाल्यानंतर गुरुवारी पहिलीच जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली. आमदार अमित देशमुख, आमदार संभाजी पाटील निलंगेकर, आमदार संजय बनसोडे, खासदार सुधाकर शृंगारे, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार बाबासाहेब पाटील, आमदार अभिमन्यू पवार, आमदार रमेश कराड, आमदार धीरज देशमुख, आमदार विक्रम काळे, जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी., मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, पोलिस अधीक्षक सोमय मुंडे उपस्थित होते.
‘माझं काय’ चालणार नाही
सध्या स्वार्थी प्रवृत्ती वाढत आहे. कोणत्याही कामात ५० टक्के स्वः केला जात आहे. ‘माझं काय’ खिशात कसे जाईल हेच पाहिले जात आहे. हे पाहिल्यानंतर मनाला वेदना होतात. मागचे पुढचे मला काही माहित नाही, या पुढे मात्र असे चालणार नाही. चौकशी करुन कारवाई करण्याची वेळ येवू देवू नका. निधीत झुकते माप देऊ पण प्रामाणिक व दर्जेदार काम करा अशी सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना यावेळी केली.
रोहित्राचा प्रश्न तातडीने सोडवला
यावेळी खासदार आमदारांनी जिल्ह्यातील शिक्षण, आरोग्य, क्रीडा, रस्ते असे अनेक प्रश्न मांडले. त्यात शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा रोहित्राचा प्रश्न सर्वांनीच ऐरणीवर धरत महावितरणच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. नादुरुस्त रोहित्रांची संख्या जास्त आहे. ऑईल नसल्याने रोहित्रच मिळत नाहीत. अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देतात. अशा तक्रारी त्यांनी केल्या. यावेळी पालकमंत्री महाजन यांनी तातडीने मुंबईतील महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. दोन तीन दिवसात ३५ किलोलीटर ऑईल लातूरला पाठवण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. इतकेच नव्हे तर डीपीसीच्या निधीतून ५० अतिरिक्त रोहित्र खरेदीच्या सूचनाही त्यांनी केली.
स्वच्छतागृह नसणे अशोभनीय
जिल्ह्यातील शाळात मुला मुलींसाठी स्वच्छतागृह नाहीत हे अशोभनीय आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना अशी परिस्थिती असावी हे वाईट आहे. आमदारांनी या संदर्भात पत्र द्यावे त्यात निधीला आठ दिवसात मंजुरी दिली जाईल. महिनाभरात हा प्रश्न मिटला पाहिजे, असा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
लातूरसाठी स्वतंत्र अधिकारी
जिल्ह्याच्या विकासाची कामे तातडीने झालीच पाहिजेत. पाहू, करु, बघतो ही माझी कार्यपद्धती नाही. पालकमंत्री या नात्याने निधीत झुकते माप दिले जाईल. पण कामे दर्जेदार करा. वीस दिवसातून एकदा येथे येण्याचा माझा प्रयत्न असेल. पण मुंबईतूनही माझे जिल्ह्यावर लक्ष असणार आहे. या करीता एक स्वतंत्र अधिकारी नियुक्त करण्यात येईल, अशी ग्वाही श्री. महाजन यांनी यावेळी दिली.