लातूरच्या पालकमंत्रिपदी संभाजी पाटील-निलंगेकर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 11 नोव्हेंबर 2016

लातूर - जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी बुधवारी (ता. 9) रात्री उशिरा कामगार, भूकंप पुनर्वसन, कौशल्य विकास व माजी सैनिक कल्याणमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कॅबिनेट मंत्री होऊन चार महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर निलंगेकर यांच्या पालकमंत्रिपदी नियुक्तीचा आदेश सरकारने काढला.

कॅबिनेट मंत्रिपदी वर्णी लागल्यापासूनच निलंगेकर यांची पालकमंत्रिपदी नियुक्ती होण्याची आशा पदाधिकारी व कार्यकर्त्यांना होती; मात्र पालकमंत्रिपद ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्याकडेच कायम राहिले. मुंडे यांच्याकडे पालकमंत्री म्हणून बीड व लातूर या जिल्ह्यांची जबाबदारी होती. त्यापैकी लातूरच्या जबाबदारीतून त्यांना मुक्त करून ही जबाबदारी निलंगेकर यांच्याकडे देण्यात येणार असल्याच्या चर्चा मध्यंतरी झडल्या; मात्र काहीच हालचाली झाल्या नाहीत. यातूनच ते पक्षाचा कार्यक्रम व शासकीय बैठकीचा अपवाद सोडला, तर लातूरला जास्त फिरकत नव्हते. या स्थितीत जास्त गाजावाजा न करता बुधवारी रात्री निलंगेकर यांची सरकारने पालकमंत्रिपदी वर्णी लावली.

काही वर्षांपूर्वी जिल्ह्यातील आमदार दिलीप देशमुख यांच्या रूपाने पालकमंत्री म्हणून जबाबदारी मिळाली होती. आमदार देशमुख यांचा अपवाद सोडला, तर आनंदराव देवकते, बाळासाहेब थोरात, सतेज पाटील व ग्रामविकासमंत्री मुंडे या जिल्ह्याबाहेरील मंत्र्यांनीच पालकमंत्री म्हणून अनेक वर्षे काम केले. मध्यंतरी काही महिने राज्यमंत्रिपद मिळालेल्या आमदार अमित देशमुख यांच्या नशिबीही पालकमंत्रिपद आले नाही. आता अनेक वर्षांनंतर निलंगेकर यांच्या रूपाने जिल्ह्यातील पालकमंत्री मिळाला आहे.

Web Title: Latur guardian minister of Sambhaji Patil-Nilangekar