लातुरात विकासकामांच्या उद्‍घाटनांना ‘ब्रेक’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Latur municipal corporation

लातुरात विकासकामांच्या उद्‍घाटनांना ‘ब्रेक’

लातूर - येथील महापालिकेच्या वतीने तीन दिवसापूर्वीच कोट्यावधीच्या कामाच्या ई कोटेशन निविदा प्रक्रिया करण्यात आली आहे. कोट्यावधीची ही २९१ विकास कामे आहेत. लवकरच त्याचे कार्यादेश देखील देण्यात येतील. त्यामुळे या कामाचे उद्‍घाटन करून लोकांसमोर जाता येईल अशी इच्छा माजी नगरसेवकांची होती. पण प्रशासक अमन मित्तल यांनी महापालिकेच्या विकास कामांचे उद्‍घाटन करु नये असे आदेश शाखा अभियंत्यांना दिले आहेत. उद्‍घाटन सोहळा झाला तर जबाबदारी निश्चित करुन कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

त्यामुळे माजी नगरसेवक आपल्या नेत्यांना आणून कशा पद्धतीने या कामाचे उदघाटन करतात याकडे लक्ष लागले आहे. महापालिकेची मुदत मे मध्ये संपली आहे. पहिले अडीच वर्ष भारतीय जनता पक्षाची सत्ता राहिली तर दुसरे अडीच वर्ष काँग्रेसची सत्ता राहिली. दोनही कालावधीत विकास कामे वाटपावरून दोनही पक्षात वाद राहिला. यातून काही प्रकरणे न्यायालयातही गेली. त्याचा परिणाम शहराच्या विकास कामावर झाला. त्यानंतर दोन वर्ष कोरोनात गेली. त्यामुळे विकास कामे ठप्प राहिली. त्यात महापालिकेची मुदत संपली. आयुक्त अमन मित्तल हे प्रशासक झाले.

त्यानंतर गेल्या तीन दिवसापूर्वीच महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजना, दलित वसती विकास सुधार योजना, दलित्तेतर वसती सुधार योजना अशा योजनातून कोट्यावधीच्या कामाची निविदा प्रक्रिया सुरु करण्यात आली. २९१ ही विकास कामे आहेत. या कामासाठी ई कोटेशन मागवण्यात आले होते. ते उघडण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. प्रत्येक प्रभागात ही कामे होणार आहेत. प्रभागातील कामाचे उद्‍घाटन करून लोकासमोर जाण्याचे माजी नगरसेवकांचे मनसुभे होते. पण आता प्रशासक अमन मित्तल यांनी महापालिकेच्या विकास कामाचे उदघाटन करू नये असे आदेश शाखा अभियंत्यांना दिले आहेत. तसेच कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

परस्पर उद्‍घाटनाची तयारी

या विकास कामाच्या उद्‍घाटनावर आता महापालिका खर्च करणार नाही हे प्रशासक अमन मित्तल यांच्या आदेशानंतर स्पष्ट झाले आहे. तसेच महापालिकेचे अधिकारी देखील उद्‍घाटनाच्या सोहळ्यात सहभागी होणार नाही हेही स्पष्ट होत आहे. त्यामुळे अनेक माजी नगरसेवकांनी मात्र कामाची कार्यादेश आल्यानंतर महापालिकेचा सहभाग न घेता उद्‍घाटन करण्याची तयारी सुरू केली आहे.

महापालिका निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यामुळे कोणत्याही विकास कामाचे उद्‍घाटन सोहळे घेऊ नयेत असे आदेश दिले आहेत. याचा अर्थ ही विकास कामे बंद राहणार आहेत असा नाही. कार्यादेश दिल्यानंतर ही विकास कामे सुरू होतील. कार्यादेश मिळून कामे सुरू केली नाहीत व दरम्यानच्या काळात निवडणुकीची आचारसंहिता लागली तर ती कामे मात्र सुरू करता येणार नाहीत.

- अमन मित्तल, प्रशासक, महापालिका.

Web Title: Latur Inauguration Of Development Work Stopped Municipal Administration Orders To Branch Engineers

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..