लातूरचे "आयटीआय' राज्यात प्रथम

हरी तुगावकर
सोमवार, 6 ऑगस्ट 2018

लातूर - केंद्राच्या कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालयाने जानेवारी ते ऑक्‍टोबर 2017 या कालावधीत विविध टप्प्यांत राज्यातील 353 औद्योगिक प्रशिक्षण संस्थांची (आयटीआय) "क्रिसील' कंपनीकडून तपासणी केली. याचे मानांकन नुकतेच जाहीर झाले असून, यात मुंबई, पुणे, कोल्हापूर, नाशिकसारख्या शहरांतील "आयटीआय'ला मागे टाकत लातूरच्या "आयटीआय'ने 2.78 रेटिंग मिळवत राज्यात पहिला क्रमांक पटकाविला आहे. त्यामुळे लातूरच्या शिक्षणाच्या पॅटर्नमध्ये आता "आयटीआय'नेही मानाचा तुरा खोवला आहे.

"क्रिसील' कंपनीने केलेल्या तपासणीत संस्थेमधील साधने, प्रशिक्षणाचा दर्जा, प्रशिक्षकांची गुणवत्ता, विद्यार्थ्यांना मिळणारे नोकरीचे प्रमाण आदी 43 बाबींचे मूल्यांकन करण्यात आले. या तपासणीपूर्वीच या "आयटीआय'ने "आयएसओ' गुणवत्ता प्रमाणपत्र प्राप्त केले होते. त्यामुळे मानांकनाच्या प्रक्रियेस संस्थेला सहज सामोरे जाता आले. याकरिता प्राचार्य प्रवीणकुमार उखळीकर, उपप्राचार्य आर. एम. परांडे, तसेच सर्व गट निदेशकांनी पुढाकार घेतला.

इतर "आयटीआय'चे रेटिंग
शिराळा (जि. सांगली) - 2.72
बीड - 2.63
नाशिक - 2.60
पुणे - 2.44
कोल्हापूर - 2.40
अंबरनाथ - 2.37
ठाणे (मुलींचे) - 2.34
एससीपी (नाशिक) - 2.34

"आयटीआय'मध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थी आहेत. त्यांना उपलब्ध साधनांचा वापर करून गुणवत्तापूर्वक प्रशिक्षण देण्याचा प्रयत्न केल्यामुळे नोकरीचे प्रमाण वाढले आहे. याकरिता कौशल्य विकास खात्याचे मंत्री व पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी प्रोत्साहन दिले. गट निदेशक, निदेशकांचे परिश्रमही महत्त्वाचे आहेत.
- प्रवीणकुमार उखळीकर, प्राचार्य, शासकीय "आयटीआय', लातूर

Web Title: Latur ITI number one in maharashtra