पंचायतराजच्या स्वागताला लातूर जिल्हा परिषदेचा कॉर्पोरेट लूक

latur
latur

लातूर : मुख्य प्रवेशाद्वारापासून रस्त्यावरील सर्व खड्डे बुजलेले, रस्त्याच्या बाजूने पांढरे पट्टे, जिल्हा परिषदेचा परिसर दृष्ट लागण्याजोगा स्वच्छ, वाहने पार्कींगमध्ये लागलेली, उद्यानात सुरू असलेले कारंजे, इमारतीच्या प्रवेशाद्वारापासून स्थायी समिती सभागृहापर्यंत लाल कार्पेट, बाजूला शोभीवंत झाडांच्या कुंड्या, आकर्षक रांगोळ्या, प्रत्येक दारासमोर रांगोळी, कर्मचारी गणवेशात, सर्वत्र वेगळीच पण शांततेतील धावपळ.. हा  मोठ्या शहराच्या ठिकाणी असलेल्या कार्यालयांचा कॉर्पोरेट लूक सोमवारी (ता. 10) जिल्हा परिषदेला आला होता. निमित्त होते पंचायतराज समितीच्या स्वागताचे !

आमदार सुधीर पारवे यांच्या अध्यक्षेखालील पंचायतराज समितीचे तीन दिवसाच्या दौऱ्यासाठी सोमवारी सकाळी जिल्हा परिषदेत आगमन झाले. त्यांच्यासोबत आठ आमदार होते. उर्वरित आमदार सायंकाळपर्यंत दाखल होण्याची शक्यता आहे. स्वागत झाल्यानंतर दुपारी बारापासूनच समितीने कामकाजाला सुरवात केली. यात सन 2013 - 2014 वर्षाच्या लेखा परिक्षण अहवालातील मुद्दयांवर मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपीन ईटनकर यांची साक्ष सुरू झाली. यासाठी विभागप्रमुख व विधान मंडळ सचिवालयातील प्रमुख अधिकारी उपस्थित होते. कामकाज सुरू होताच जिल्हा परिषदेतील अधिकारी व कर्मचारी सतर्क झाले होते. स्थायी समिती सभागृह आतून बंद असल्याने काही निरोप येताच त्याची पूर्तता करण्याच्या तयारीत सर्वजण दिसून येत होते. सभागृहासमोरच छोटे कॅंटीन सुरू करण्यात आले होते. त्यातून अल्पोपहार व चहाची सोय करण्यात आली होती. समितीच्या निमित्ताने जिल्हा परिषदेचे वेगळे रूप दिसून येत होते. जिल्हा परिषद दररोज अशीच रहावी, अशी अपेक्षा सोमवारचे चित्र पाहून अनेकांनी व्यक्त केली.  

माजी अधिकारी अन् आठवणी
लातूर जिल्हा परिषदेत सन 2013 ते 2015 या काळात कार्यरत 27 हून अधिक माजी अधिकाऱ्यांना पंचायतराज समितीच्या दौऱ्यासाठी सोमवारी पाचारण करण्यात आले आहे. सकाळी दहा वाजताच हे अधिकारी जिल्हा परिषदेत दाखल झाले असून त्यांच्याशी संबंधित मुद्दे व अन्य आक्षेपार्ह गोष्टींचा ते अभ्यास करताना दिसत होते. सर्व अधिकाऱ्यांना अध्यक्ष मिलिंद लातूरे यांच्या कक्षात थांबवण्यात आले होते. अनेक दिवसाच्या भेटीनंतर सर्वजण जुन्या आठवणींना उजाळा देताना दिसले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com