गुटख्यासाठी केले टेंम्पोचे अपहरण आणि..

हरी तुगावकर
बुधवार, 13 नोव्हेंबर 2019

गुटखा मिळवण्यासाठी तिघांनी टेंपो आणि चालकासह दोघांचे अपहरण केले. या अपहरणकर्त्यांना तर पोलिसांनी पकडलेच पण महाराष्ट्रात गुटखा बंदी असतांना गुटखा घेऊन येणारेही पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहेत. अपहरणकर्त्यांमुळे पोलिसांना अवैध गुटखा पकडणारेही सापडले आहेत. 

लातूर ः गुटखा मिळवण्यासाठी तिघांनी टेंपो आणि चालकासह दोघांचे अपहरण केले. या अपहरणकर्त्यांना तर पोलिसांनी पकडलेच पण महाराष्ट्रात गुटखा बंदी असतांना गुटखा घेऊन येणारेही पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहेत.

अपहरणकर्त्यांमुळे पोलिसांना अवैध गुटखा पकडणारेही सापडले आहेत. 

राज्यातील नेत्यांनी 'ही' भीती घातल्यामुळे सोनिया गांधी पाठिंब्यास झाल्या तयार

आंध्रप्रदेशातून लाखो रुपयांचा अवैध गुटखा घेवून आलेल्या आयशर टेंम्पोचे चालक आणि इतर एका व्यक्तीचे अपहरण केल्याप्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे. हा अवैध गुटख्याचा टेंम्पोही जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी केली आहे. या प्रकणाचा तपास एमआयडीसी पोलिस ठाण्याचे पोलिस करीत आहेत. 

बुधवारी (ता. 13) पहाटे आंध्रप्रदेशातील संगारेड्डी येथून लाखो रुपयांचा गुटखा घेवून एमएच 25 यु 1227 हा आयशर टेंम्पो बार्शीकडे जात होता. पहाटेच्या वेळी हा टेंम्पो हरंगुळ रेल्वे स्टेशनजवळ आला. या टेंम्पोला काही लोकांनी अडवले. टेंम्पोसह चालक रसूल इनामदार (रा. उमरगा) व एका व्यक्तीचे अपहरण करून हा टेंम्पो दगडवाडी येथे नेण्यात आला.

पवारांनी धनंजय मुंडेंची 'का' करून दिली काँग्रेसच्या चाणक्याला विशेष ओळख

टेंम्पोमधील गुटखा घेण्याचा या व्यक्तींचा प्रयत्न असावा असा पोलिसांचा संशय आहे. दरम्यान या घटनेची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तातडीने कारवाई करीत हा अवैध गुटख्याचा टेंम्पो तर जप्त केलाच पण अपहरण करणाऱ्या नितीन शिवाजी जाधव (रा. सिरसी), सोमनाथ शंकर आंग्रे (रा. मोतीनगर) व अमोल दिलीप राठोड (रा. सिंदाळा) या तिघांना ताब्यात घेतले आहे.

या प्रकरणात आणखी दोघेजण असून त्यांचा पोलिस शोध घेत आहेत. यातील नितीन जाधव हा अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचा जिल्हा संघटक आहे, अशी माहिती पोलिस उपनिरीक्षक सचिन सांगळे यांनी दिली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: latur kidnapping of gutkha tempo driver