esakal | Latur latest news Corona virus Relatives at collector office for Remedivisvir

बोलून बातमी शोधा

null

Coronavirus| ‘रेमडेसिव्हिर’साठी नातेवाईक जिल्हाधिकारी कार्यालयात, अधिकारी वैतागले

sakal_logo
By
प्रमोद सरवळे

लातूर: कोरोना बाधित गरजू रुग्णांसाठी लागणाऱ्या रेमडेसिव्हिर इंजेक्शनसंदर्भात सर्व नियंत्रण जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या हातात घेतले आहे. प्रशासनामार्फतच आता औषध विक्रेत्यांना त्याचा पुरवठा केला जात आहे. पण, पुरवठा कमी असल्याने समन्यायी पद्धतीने त्याचा पुरवठा केला जात आहे. आता रुग्णाचे नातेवाईक थेट जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन इंजेक्शन देण्याची मागणी करीत आहेत. या प्रकाराला प्रशासनातील अधिकारी वैतागले आहेत. यातूनच आता जिल्हाधिकारी कार्यालयात न येण्याचा सल्ला प्रशासनाने नागरिकांना दिला आहे.

जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. रेमडेसिव्हिरची मोठ्या प्रमाणात आवश्यकता आहे. पण, पुरवठा मात्र कमी आहे. या इंजेक्शनच्या अल्प उपलब्धतेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन, सर्व संबंधित स्टॉकिस्ट, केमिस्ट व कोविड रुग्णालय हे लातूर जिल्ह्यामध्ये बाहेरून अधिकाधिक रेमडेसिव्हिर उपलब्ध करण्याबाबत सातत्याने प्रयत्न करीत आहेत, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयात कोणत्याही रुग्णास किंवा त्याच्या नातेवाइकास किंवा इतर कोणत्याही व्यक्तीस थेट रेमडेसिव्हिर उपलब्ध करून दिले जात नाही. तरीही अनेक नागरिक जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन तसेच फोनवर सातत्याने रेमडेसिव्हिरची मागणी करीत आहेत.

रेमडेसिव्हिरच्या साठ्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन) यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. हे नोडल अधिकारी जिल्ह्यातील सर्व कोविड रुग्णालय, स्टॉकिस्ट, केमिस्ट या सर्वांकडे उपलब्ध होणाऱ्या रेमडेसिव्हिर इंजेक्शन हे संपूर्ण जिल्ह्यातील कोविड रुग्णालय येथे समन्यायी पद्धतीने (सर्व कोविड रुग्णालयातील व्हेंटीलेटरवरील रुग्ण, आयसीयूमधील रुग्ण तसेच रेमडेसिव्हिर सुरू असलेले रुग्ण यांचे प्रमाणात) वितरित करीत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील कोणत्याही रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाइकांनी रेमडेसिव्हिरसाठी वैयक्तिकरीत्या जिल्हाधिकारी कार्यालयात येऊ नये, असे आवाहन नोडल अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक यांनी केले आहे.