'रस्त्यांच्या कामांत जाणून बुजून अडथळा आणाल तर सोडणार नाही' जिल्हाधिकाऱ्यांचा सज्जड इशारा

जलील पठाण
Monday, 22 February 2021

रविवारी (ता. २१) औसा तालुक्यातील उंबडगा पानंद रस्ते व शेतरस्ते कामाच्या उदघाटन प्रसंगी जिल्हाधिकारी बोलत होते

औसा (लातूर): 1960 पासूनच शेतरस्ते व पाणंद रस्ते मोकळे करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र हे रस्ते मोकळे करताना आमच्याच प्रशासनातील काही लोकांच्या हलगर्जी आणि भित्रेपणामुळे हा प्रश्न आजही कायम आहे. रस्त्याच्या कामात कोणी जाणून बुजून अडथळा आणला तर त्याला मी सोडणार नाही, असा सज्जड इशारा जिल्हाधिकारी पृथ्वीरज बी. पी. यांनी शेतरस्ते मोकळे करताना विरोध करणाऱ्यांना दिला आहे.

रविवारी (ता. २१) औसा तालुक्यातील उंबडगा पानंद रस्ते व शेतरस्ते कामाच्या उदघाटन प्रसंगी जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी पुढे बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले की, अनेक गावात शेतरस्ते नीट नसल्याने शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. हे शेतरस्ते मोकळे करण्याची जबाबदारी असलेल्या प्रशासनातील अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना उगीच कोणाचा विरोध कशाला ओढवून घ्यायचा या प्रवृत्तीमुळे हा प्रश्न सुटत नाही. जर शेतकऱ्यांना चांगले शेतरस्ते मिळाले तर त्यांच्या उत्पादनात वाढ होईल. वेळेवर शेतीची कामे होतील. किरकोळ कारण आणि न्यायालयात जाण्याची धमकी देत कोणी या चांगल्या कामात अडथळे आणू नयेत. अन्यथा मी कोणालाच सोडणार नाही.

जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पंडीतराव धुमाळ राष्ट्रवादीच्या वाटेवर;...

तुमच्या दोन चार जणांमुळे अख्ख्या गावच्या विकासाचा मार्ग मी कधीही बंद पडू देणार नाही. शेतकऱ्यांना वरदान ठरणाऱ्या रेशीम उद्योगाला चालना देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. जिल्ह्यात पाच हजार एकरावर ही रेशीम शेती करण्याचे उद्दिष्ट आम्ही ठेवले आहे. यामध्ये चार हजार एकर पोखरामधून तर उर्वरित एक हजार एकर हे नरेगातून केले जाणार आहे. त्यासाठी पण रेशीम शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी आपले प्रस्ताव सादर करण्याची गरज असल्याचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज पी. बी. म्हणाले.

रस्त्याचे वाद जागेवर सोडवा
यावेळी जिल्हाधिकारी पृथ्वीराज यांनी उपस्थित महसूल अधिकाऱ्यांना सांगितले की, रस्त्याच्या कामात काही वाद असतील तर उपलब्ध नकाशा, शासनाचे आदेश आणि कायदा समोर ठेवून हे वाद मिटवावेत. तुम्हाला मिळालेल्या अधिकाराचा जर योग्य वापर केला तर अशा समस्या मिटण्यास काहीच वेळ लागणार नाही. आमदार निधीतून शेतरस्त्याचे मातीकाम झाल्यावर खडीकाम नरेगातून करण्याचे प्रपत्रक काढले असून त्यानुसार जिल्ह्यातील कामे चालू करा असे आदेशही त्यांनी यावेळी दिला.

स्वप्नं पापण्यातले पापण्यातच विरले, कुटुंबाचा आधार होऊ पाहणाऱ्या जिद्दी...

या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल, अतिरिक्त जिल्हाधिकारी अरविंद लोखंडे, आमदार अभिमन्यू पवार उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे, गटविकास अधिकारी सूर्यकांत भुजबळ, बांधकाम विभागाचे उपअभियंता जयवंत जाधव, नायब तहसीलदार सुभाष कानडे, भाजपचे तालुकाध्यक्ष सुभाष पवार, संतोष मुक्ता, दत्तात्रय कोळपे यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Latur latest news in marathi district collector warned those opposing road works