जलजीवन मिशनमध्ये लातूर राज्यभरात आघाडीवर! 

jaljivan mission.jpg
jaljivan mission.jpg

लातूर : ‘हर घर जल’चा नारा देत केंद्र सरकारने हाती घेतलेल्या राष्ट्रीय जल जीवन मिशनमध्ये जिल्ह्यात जोरदार काम सुरू आहे. मिशनमध्ये प्रत्येक कुटुंबांना शुद्ध पाणी पुरवठ्यासाठी नळ जोडणी देण्यात येत आहे. जिल्ह्यातील दोन लाख १३ हजार कुटुंबांना या योजनेचा लाभ होणार असून, सात महिन्यांत ५६ हजार ४०६ कुटुंबांना सरकारी खर्चाने नळजोडणी देण्यात आली आहे. चालू आर्थिक वर्षात आणखी कुटुंबांना नळजोडण्या देण्यात येणार असून, त्यासाठी पंधराव्या वित्त आयोगाचा निधी खर्च करण्याची मुभा जिल्हा परिषदेने ग्रामपंचायतींना दिली आहे.

राज्याच्या तुलनेत जिल्हा परिषदेने मिशनच्या कामात आघाडी घेतली आहे. जिल्ह्यात उद्दिष्टाच्या ६२ टक्के तर राज्यात ३६ टक्के काम झाले आहे. नव्या जलनीतीनुसार ग्रामीण भागात रोज दरडोई ५५ लिटर पाणीपुरवठा करणे बंधनकारक आहे. काही भागात पाण्याचे शाश्वत स्रोत नसल्याने ५५ लिटरचे प्रमाण राखणे शक्य होत नाही. या स्थितीत उपलब्ध असलेले पाणी सर्व कुटुंबाला नळाद्वारे पुरवठा करण्यासाठी सरकारने जल जीवन मिशन हाती घेतले आहे. महाराष्ट्रात एक एप्रिलपासून हे मिशन सुरू झाले आहे. कुटुंब संख्येसाठी स्वच्छ भारत मिशनमध्ये स्वच्छतागृहासाठी केलेल्या सर्वेक्षणाचा आधार घेतला आहे.

सर्वेक्षणानुसार नळजोडणी नसलेल्या कुटुंबांना सरकार खर्चाने नळ कनेक्शन अर्थात जोडणी देण्यात येत आहे. पूर्वी नळजोडणी ग्रामस्थांना स्वखर्चाने घ्यावी लागत होती. तीन मिशनमध्ये ती ग्रामपंचायतींकडून देण्यात येत आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील तीन लाख ८० हजार ३७७ कुटुंब असून, एक लाख ६६ हजार ७४४ कुटुंबांकडे पूर्वीच्याच नळजोडण्या आहेत. नळजोडण्या नसलेल्या दोन लाख १३ हजार ६३३ कुटुंबांना मिशनमधून सरकारी खर्चाने नळजोडण्या देण्यात येणार आहेत. यात चालू आर्थिक वर्षात जिल्ह्यात ९२ हजार २८३ जोडण्याचे उद्दिष्ट असून, सात महिन्यांत ५६ हजार ४०६ कुटुंबांना नळजोडण्या देण्यात आल्या आहेत. शिरूर अनंतपाळ तालुक्यात उद्दिष्टापेक्षा दीडपट काम झाले असून, उर्वरित नऊ तालुक्यांत ८० ते ३३ टक्क्या दरम्यान काम झाले आहे. वर्षाअखेरपर्यंत नळजोडणीचे उद्दिष्ट पूर्ण होण्याची आशा जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचे शाखा अभियंता एस. एस. राघू यांनी व्यक्त केली. 

 
आधारलिंक तांत्रिकदृष्ट्या योग्य जोडणी 
स्वच्छ भारत मिशनमध्ये स्वच्छतागृहाचे अनुदान देण्यासाठी बहुतांश कुटुंबप्रमुखाचे आधार क्रमांक लिंक केला आहे. राहिलेल्यांचे आधार लिंक करण्याचे काम जल जीवन मिशनमध्ये सुरू आहे. यामुळे सरकारी खर्चाने दोनदा व बनावट नळजोडण्यांच्या प्रकारांना आळा बसणार आहे. पूर्वी कोणत्याही पद्धतीने नळजोडण्या दिल्या असल्या तरी मिशनमध्ये तांत्रिकदृष्ट्या योग्य अशी जोडणी देण्यात येत आहे. एका नजोडणीसाठी एक हजार सातशे रुपये खर्च मंजूर करण्यात आला असून, हा खर्च ग्रामपंचायतींना पंधराव्या वित्त आयोगातून करता येणार असल्याचे शाखा अभियंता राघू यांनी सांगितले. 

(संपादन-प्रताप अवचार)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com