पाणी अन्‌ डांबराच्या ‘दोस्ती’वरून बांधकाममध्ये वादळ!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 जून 2017

लातूर - लातूर-मुरूड राज्य महामार्गावर भरपावसाळ्यात सुरू असलेल्या डांबरीकरणाचे काम ‘सकाळ’ने सोमवारी (ता. २६) उघड केले. त्यानंतर या कामावरून सार्वजनिक बांधकाम विभागात चांगलेच वादळ उठले आहे. कामाच्या निमित्ताने बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांतील बेबनावही उघड झाला असून, याचा फायदा कंत्राटदाराने घेत काम पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. शेवटच्या टप्प्यात आलेले काम रोखण्यात आले असून, कामाचा दर्जा टिकून राहिला तरच कंत्राटदाराला बिल देण्याचा निर्णय अधिकाऱ्यांनी घेतला आहे. 

लातूर - लातूर-मुरूड राज्य महामार्गावर भरपावसाळ्यात सुरू असलेल्या डांबरीकरणाचे काम ‘सकाळ’ने सोमवारी (ता. २६) उघड केले. त्यानंतर या कामावरून सार्वजनिक बांधकाम विभागात चांगलेच वादळ उठले आहे. कामाच्या निमित्ताने बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांतील बेबनावही उघड झाला असून, याचा फायदा कंत्राटदाराने घेत काम पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. शेवटच्या टप्प्यात आलेले काम रोखण्यात आले असून, कामाचा दर्जा टिकून राहिला तरच कंत्राटदाराला बिल देण्याचा निर्णय अधिकाऱ्यांनी घेतला आहे. 

पाण्याचे व डांबराचे समीकरण जुळत नसतानाही लातूर-मुरूड रस्त्यावर पावसाळा सुरू झाल्यापासून बांधकाम विभागाकडून डांबरीकरणाच्या कामाचा धडाका सुरू आहे. लातूर शहरापासून मांजरेश्वर हनुमान मंदिरापर्यंतच्या डांबरीकरणाच्या कामात शेवटचा थरही पावसाळा सुरू असतानाच देण्यात आला. त्यानंतर रविवारपासून (ता. २५) याच रस्त्यावरील या चाँदपीर दर्गापासून पुढे डांबरीकरणाचे काम सुरू केले. हेच काम कंत्राटदाराने उन्हाळ्यात अर्धवट सोडून दिले होते. त्या वेळी अधिकाऱ्यांनी निधी संपल्याने कंत्राटदाराने काम बंद केल्याचे सांगितले होते. 

हे काम भरपावसाळ्यात सुरू झाल्याने कामाचा दर्जा टिकून राहणे शक्‍य नव्हते. पाणी व डांबराचे वाकडे असताना सुरू असलेल्या कामाबाबत ‘सकाळ’ने सोमवारच्या (ता. २६) अंकात ‘बांधकाम विभागाच्या प्रतापाने लातुरात पाणी अन्‌ डांबराची दोस्ती’ या शीर्षकाखाली वृत्त दिले. यानंतर बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी खडबडून जागे झाले. कार्यकारी अभियंता नरसिंग भंडे यांनी तर बातमीतूनच त्यांना पावसाळ्यात काम सुरू असल्याबाबत कळाल्याचे सांगितले. त्यांनी लागलीच या कामाला भेट देत काम रोखले होते. यामुळे सोमवारी दिवसभर काम बंद होते. एकाच बाजूने डांबरीकरणाचा थर देण्याचे काम झाले होते. आता पावसाळा संपल्यानंतरच उर्वरित काम होईल, असे वाटत असताना मंगळवारी (ता. २६) सकाळपासूनच हे काम पुन्हा सुरू झाले. 

एक राजी, तर दुसऱ्याची नाराजी
रस्त्याच्या एका बाजूने काम झाल्यानंतर दुसऱ्या बाजूचे काम ठेवता येत नसल्याचे स्पष्ट करून उपकार्यकारी अभियंता एस. एस. पाटील यांनी हे काम सुरू केल्याचे सांगितले. कामाला भेट दिली असून ते दर्जेदार होत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यानंतर दुपारी उस्मानाबादहून परत येत असताना कार्यकारी अभियंता भंडे यांना हे काम सुरू असल्याचे दिसले. त्यांनी नाराजी व्यक्त करीत कामाचा दर्जा टिकून राहिला तरच बिल देण्याचा निर्णय कंत्राटदाराला कळविल्याचे सांगितले. दरम्यान, शेवटच्या टप्प्यात आलेले हे काम रोखण्यात आले असून, कामाचे आणखी दोन टप्पे राहिल्याची माहिती उपकार्यकारी अभियंता पाटील यांनी दिली. यातून पावसाळ्यात सुरू असलेल्या कामासाठी एक अधिकारी राजी, तर दुसऱ्या अधिकाऱ्यांची नाराजी दिसून आली. 

मंजूर काम सुरू होईना
याच रस्त्यावर मांजरेश्वर हनुमान मंदिरापासून साखरा पाटीच्या पुढील पुलापर्यंतच्या डांबरीकरणाचे काम मंजूर झाले आहे. काम मंजूर होऊन अनेक महिने झाले तरी ते सुरू झालेले नाही. तालुक्‍यात अशी अनेक कामे मंजूर होऊन सुरू झाली नसल्याचे यानिमित्ताने पुढे आले. यातूनच बांधकाम विभागच्या अधिकाऱ्यांचा कंत्राटदारावर वचक राहिला नसल्याचे व अधिकाऱ्यांतील बेबनावाचा कंत्राटदार फायदा उठवीत असल्याचे दिसून आले. यातूनच कंत्राटदार त्यांच्या सवडीने कामे करीत असल्याने कामाच्या दर्जावर परिणाम होत आहे.

Web Title: latur marathwada news dispute construction on water & tar