कर्जमाफीच्‍या ऑनलाईन अर्जाचा मान गातेगावला

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 जुलै 2017

लातूर - राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी हाती घेतलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज भरण्याचा प्रारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवारी (ता. २४) विधान भवनातून झाला. स्काईप ॲप्लिकेशनच्या साहाय्याने या उपक्रमात सहभागी होण्याचा मान राज्यात गातेगाव (ता. लातूर) येथील शेतकऱ्यांना मिळाला. या वेळी शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधत कर्जमाफीबद्दल त्यांचे आभार मानले.

लातूर - राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी हाती घेतलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत ऑनलाईन अर्ज भरण्याचा प्रारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवारी (ता. २४) विधान भवनातून झाला. स्काईप ॲप्लिकेशनच्या साहाय्याने या उपक्रमात सहभागी होण्याचा मान राज्यात गातेगाव (ता. लातूर) येथील शेतकऱ्यांना मिळाला. या वेळी शेतकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधत कर्जमाफीबद्दल त्यांचे आभार मानले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ‘‘राज्यभरातील २६ हजार ‘आपले सरकार’ केंद्रातून शेतकऱ्यांना ऑनलाईन अर्ज भरता येतील. योजनेंतर्गत पात्र असलेल्या शेतकऱ्यांनाच कर्जमाफीचा लाभ होणार आहे. योजनेत दीड लाखापर्यंत कर्ज माफ होणार असून नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांनाही पंचवीस हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर कर्जमाफी देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे.’’

पुढील दहा ते पंधरा दिवसांत राज्यातील सर्व शेतकऱ्यांनी अर्ज भरून द्यावेत. कर्जमाफीसाठी सरकार पुरवणी मागणीद्वारे निधीची तरतूद करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी आवर्जून सांगितले. सुरवातीला सहकार विभागाचे अप्पर मुख्य सचिव एस. एस. संधू व माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव व्ही. के. गौतम यांनी ऑनलाईन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेची माहिती दिली. यावेळी मुख्यमंत्र्यांसमवेत सहकारमंत्री सुभाष देशमुख व पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर उपस्थित होते. गातेगाव येथील शेतकरी सुधाकर सातपुते, मीरा सातपुते व वीरसेन भोसले या शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत कर्जमाफीबाबत संवाद साधून आभार मानले.

गातेगावच्या सरपंच अलका धवारे उपस्थित होत्या. अपर जिल्हाधिकारी डॉ. पुरुषोत्तम पाटोदकर, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, तहसीलदार संजय वारकड, जिल्हा उपनिबंधक बी. एल. वांगे, सहायक निबंधक ए. एस. कदम, जिल्हा अग्रणी बॅंक अधिकारी शंकर बुरडे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गातेगावचे ३५० शेतकरी पात्र
कर्जमाफीसाठी गातेगाव येथील ७८० पैकी ३५९ शेतकरी पात्र ठरल्याची माहिती या वेळी देण्यात आली. सोमवारी कर्जमाफीसाठी दोन शेतकऱ्यांचा ऑनलाईन अर्ज भरण्यात आला. उर्वरित शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज भरण्याचे व अर्जात सर्वांनी आपले आधार कार्ड व बॅंक खाते क्रमांकाची माहिती द्यावी, असे आवाहन डॉ. पाटोदकर यांनी शेतकऱ्यांना केले. आपले सरकार केंद्राचे लहू ननावरे यांचा सत्कार करण्यात आला. जिल्हा बॅंकेचे संचालक नाथसिंह देशमुख, सहायक पोलिस निरीक्षक एस. ए. चव्हाण, प्रशांत राजगुरू, अजय पवार, तानाजी पवार व वीरसेन भोसले उपस्थित होते.

कार्यक्रमासाठी वेगवान इंटरनेट
गातेगाव येथे योजनेचा ऑनलाईन प्रारंभ करण्याच्या सूचना सरकारकडून रविवारी (ता. २३) मिळाल्यानंतर जिल्हा प्रशासनाची धावपळ उडाली. गातेगाव येथे वेगवान इंटरनेट सेवेसाठी जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी बीएसएनएलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून तशी व्यवस्था केली. 

Web Title: latur marathwada news Gategaon will accept the online loan waiver application