मुलीच्या गर्भपातप्रकरणी पोलिस निरीक्षक निलंबित

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 नोव्हेंबर 2017

लातूर - बलात्कारपीडित अल्पवयीन मुलीच्या गर्भपात प्रकरणात अखेर देवणी पोलिस ठाण्याचे तत्कालीन निरीक्षक व सध्याचे आर्थिक गुन्हे शाखेचे निरीक्षक कृष्णदेव पाटील यांना नांदेड परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक चिरंजीव प्रसाद यांनी निलंबित केले. त्यांची चौकशी सुरू झाली असून, अहवालानंतर त्यांच्यावर गुन्हा नोंद होणार आहे.

देवणी तालुक्‍यातील कुटुंब गेल्या वर्षी दिवाळीनंतर ऊसतोडीसाठी तामिळनाडूला गेले होते. या कुटुंबातील अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवत सुरेश पवार, मुकादम अरुण राठोड यांनी परळी येथे पळवून नेले होते. तेथे त्यांनी तिच्यावर अत्याचार केला. मुलीच्या कुटुंबीयांनी देवणी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन बाललैंगिक अत्याचार प्रतिबंध कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल झाला. उदगीर येथील उपजिल्हा रुग्णालयात मुलीची वैद्यकीय तपासणी केली असता ती दोन महिन्याची गर्भवती असल्याचे निष्पन्न झाले होते.

दरम्यानच्या काळात देवणी पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलिस निरीक्षक कृष्णदेव पाटील यांनी या मुलीला गोळ्या देऊन गर्भपात घडवून आणला, असा आरोप करून आरोपींना अटक करण्याची मागणी कुटुंबीयांनी केली होती. या प्रकरणात दबाव येत असल्याचा जवाब या कुटुंबीयांनी न्यायालयातही दिला होता. या घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस अधीक्षक डॉ. राठोड यांनी निरीक्षक कृष्णदेव पाटील यांची काही दिवसांपूर्वी आर्थिक गुन्हे शाखेत बदली केली होती. या प्रकरणातील प्राथमिक तपासात पोलिसांनी काही गोळ्याही जप्त केल्या आहेत.

Web Title: latur marathwada news police officer suspend by girl abortion