सर्पदंशानंतरही मिळविले 73.80 टक्के गुण

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 जून 2017

कबनसांगवीतील प्रतीक्षा कांबळेचे दहावीत यश

कबनसांगवीतील प्रतीक्षा कांबळेचे दहावीत यश
लातूर - दहावीचा इंग्रजीचा पेपर... निघण्याची तयारी झालेली असते... अशात तिला सर्पदंश होतो...! काय करावे... परीक्षेला जावे की नाही... अशा विचारावर ती जिद्दीने मात करते... कुणालाही न सांगता ती पेपरला जाते... पण, तेवढ्यातच तिला अस्वस्थ वाटू लागते... मैत्रिणी शिक्षकांना सांगतात... ते तिला तातडीने रुग्णालयात दाखल करतात... हार न मानणारी "ती' तशा अवस्थेतही पेपर देण्याची इच्छा व्यक्त करते... एव्हाना मंडळाच्या अध्यक्षांना ही बाब कळते... ते व्यक्तिशः तिला भेटायला जातात अन्‌ तिथेच तिला प्रश्‍नपत्रिका सोडविण्याची परवानगी देतात... ती या संधीचे सोने करते अन्‌ दहावीत घवघवीत यश मिळविते... प्रतीक्षा कांबळे या जिद्दी तरुणीची ही कथा सर्वांनाच प्रेरणादायी आहे.

बकबनसांगवी (ता. चाकूर) येथील महात्मा फुले विद्यालयाची प्रतीक्षा कांबळे ही विद्यार्थिनी आहे. दहावीची परीक्षा सुरू असताना इंग्रजीच्या पेपरच्या दिवशी या मुलीला साप चावला होता. परीक्षेला जाऊ देणार नाहीत या भीतीने साप चावल्याची माहिती तिने पालकांनाही दिली नाही. तशीच ती परीक्षा केंद्रावर गेली; पण तेथे तिला अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर तिने याची माहिती आपल्या मैत्रिणींना दिली.

मैत्रिणींनी शिक्षकांना सांगितल्याव त्यांनी प्रतीक्षाला तातडीने चाकूर येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. तेथे प्राथमिक उपचार करून प्रतीक्षाला लातूरच्या शासकीय रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल केले. डॉक्‍टरांनी उपचार केल्याने धोका टळला होता. रुग्णालयात असतानाच पेपर देण्याची इच्छा तिने व्यक्त केली होती. याची माहिती विभागीय मंडळाचे सचिव डॉ. गणपत मोरे यांना देण्यात आली होती. त्यानंतर डॉ. मोरे व मंडळाच्या इतर अधिकाऱ्यांनी रुग्णालयात जाऊन प्रतीक्षाची चौकशी करुन रुग्णालयातच बसून इंग्रजीची प्रश्‍नपत्रिका सोडविण्याची व्यवस्था केली होती. एक तास उशिराने तिला प्रश्‍नपत्रिका मिळाली होती. अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत तिने परीक्षा दिली. दहावीच्या आज लागलेल्या निकालात इंग्रजीत तिला 54 गुण मिळाले आहेत. इतर विषयांमध्ये मराठीत 67, हिंदीत 65, गणितात 73, विज्ञानमध्ये 73, सामाजिक शास्त्रात 71 गुण तिला मिळाले आहेत. तिची टक्केवारी 73.80 इतकी आहे, अशी माहिती डॉ. मोरे यांनी दिली. साप चावून देखील रुग्णालयात उपचार घेत मिळविलेल्या यशाबद्दल मंडळानेही प्रतीक्षाचे कौतुक केले आहे.

Web Title: latur marathwada news pratiksha kambale ssuccess in ssc exam