हासोरी अन्‌ किल्लारीत सौरऊर्जा प्रकल्प

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 28 जानेवारी 2018

लातूर - शेतकऱ्यांच्या शेतीपंपांना अखंडित व माफक दरात वीज उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना हाती घेतली आहे. या योजनेतून जिल्ह्यात हासोरी (बु., ता. निलंगा) व किल्लारी (ता. औसा) येथे प्रत्येकी तीन मेगावॅट दैनंदिन वीजनिर्मितीचे सौरऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. यातील हासोरीचा प्रकल्प लवकरच सुरू होऊन या परिसरातील शेतकऱ्यांना शाश्‍वत वीज मिळणार आहे, अशी माहिती पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिली.

जिल्हा क्रीडा संकुलाच्या प्रांगणात शुक्रवारी (ता. २६) प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित मुख्य शासकीय ध्वजवंदनप्रसंगी ते बोलत होते. जिल्हा परिषद अध्यक्ष मिलिंद लातुरे, जिल्हाधिकारी जी. श्रीकांत, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विपीन ईटणकर, पोलिस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड, माजी खासदार रूपा पाटील निलंगेकर, महापौर सुरेश पवार, जिल्हा परिषद उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती. श्री. निलंगेकर पुढे म्हणाले, ‘‘राज्यात सरकारच्या वतीने एक डिसेंबर २०१७ ते १५ ऑगस्ट २०१९ या कालावधीत महाराष्ट्र मोतीबिंदूमुक्त अभियानाचा महत्वाकांक्षी प्रकल्प राबवण्यात येत आहे. जिल्ह्यात या अभियानाचे काम वेगाने सुरू होऊन लवकरच जिल्हा मोतीबिंदूमुक्त होणार आहे.

मोतीबिंदूमुक्त व कॅन्सरमुक्त लातूर जिल्हा हे अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी सरकारकडून सर्वतोपरी मदत देण्यात येणार आहे. सरकारने विवेकानंद कॅन्सर हॉस्पिटलला कॅन्सर रुग्णांवर उपचार करण्यासाठी मोठा निधी मंजूर केलेला आहे. याचा जिल्ह्यातील रुग्णांनी लाभ घ्यावा.’’ स्वच्छ भारत मिशनअंतर्गत जिल्ह्यात दोन लाख ८६ हजार २०३ स्वच्छतागृह बांधण्याचे उद्दिष्ट जिल्हा परिषदेने पूर्ण केले असून जिल्हा पाणंदमुक्त झाला आहे. यानिमित्त जिल्ह्यात स्वच्छतेची नवी पहाट उगवल्याचे श्री. निलंगेकर यांनी सांगितले. या वेळी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत ध्वजवंदन झाले. त्यांनी परेडचे निरीक्षण केले. त्यांच्या हस्ते गुणवंत खेळाडू, गुणवंत क्रीडा संघटक, दिव्यांग व्यक्ती अर्थसाहाय्य योजनेंतर्गतचे प्रोत्साहन देणाऱ्या व्यक्ती तसेच जिल्ह्यात अवयवदान मोहिमेचा प्रारंभ करणाऱ्या (कै). किरण लोभे यांच्या कुटुंबीयांचा सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक, शहीदांच्या वीरमाता व वीरपत्नी यांचाही सत्कार करण्यात आला. संवादतज्ज्ञ उद्धव फड यांनी सूत्रसंचालन केले.

Web Title: latur marathwada news solar power project in hasori and killari